कल्याण-डोंबिवलीत आरोग्यक्रांती
पालिकेची तीन रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न; सात वर्षांचा ऐतिहासिक करार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : कल्याण-डोंबिवलीकरांना आता दर्जेदार उपचारांसाठी खासगी रुग्णालयांच्या महागड्या बिलांचा भार सोसावा लागणार नाही. महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांना अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्याच्या निर्णयाला महापालिका प्रशासनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात सात वर्षांच्या कालावधीसाठी हा करार होणार आहे. यात रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, शक्तिधाम रुग्णालय या तीन रुग्णालयांचा समावेश आहे.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडले गेल्याने पालिकेच्या रुग्णालयांना तज्ज्ञ अध्यापक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स मिळतील. तसेच रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राधान्याने अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे. डॉक्टरांची कमतरता आणि अपुऱ्या सुविधांमुळे होणारी रुग्णांची ससेहोलपट थांबणार असून, तत्पर आरोग्यसेवा मिळेल. अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतःची रुग्णालय इमारत उभारणीच्या टप्प्यात आहे. ती पूर्ण होईपर्यंत (किंवा किमान ७ वर्षे) विद्यार्थी आणि प्रशिक्षणासाठी पालिकेची रुग्णालये वापरली जातील. गौरीपाडा रुग्णालयात आवश्यक अध्यापक आणि कर्मचारी उपलब्ध झाल्यावर महाविद्यालयाच्या ताब्यात दिले जाईल. शक्तिधाम रुग्णालयात आरक्षण बदलाचा तांत्रिक प्रश्न सुटल्यानंतर हस्तांतरित केले जाईल. वेळेपूर्वी इमारत पूर्ण झाल्यास: जर महाविद्यालयाची स्वतःची इमारत सात वर्षांच्या आत तयार झाली, तर हा करार आधीच संपवण्याचा पर्यायही प्रशासनाने खुला ठेवला आहे.
अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय
राज्य सरकारने जुलै २०२३ मध्ये अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून ही मंजुरी मिळाली आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असले तरी संलग्न रुग्णालयाची इमारत अद्याप उभारणीच्या टप्प्यात आहे.
सात वर्षांसाठी पालिका रुग्णालयांचा वापर
संलग्न रुग्णालयाची उभारणी पूर्ण होईपर्यंत किमान सात वर्षांसाठी कल्याण-डोंबिवली पालिकेची तीन रुग्णालये विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरण्याची मागणी अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी पालिकेकडे केली होती. त्यावर पालिकेने सकारात्मक होकार दिला आहे. यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्तावावर आयुक्त अभिनव गोयल आणि पालिका सचिव किशोर शेळके यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. पालिका आरोग्य विभागानेदेखील त्यास मान्यता दिली आहे. मात्र महाविद्यालयाची इमारत वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास ही संलग्नता आधीच संपविण्याचाही विचार करण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रशासनाची भूमिका
निर्णयाचे स्वागत होत असतानाच, रुग्णालये हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेच्या विद्यमान कर्मचाऱ्यांचे काय होणार आणि पालिकेला आर्थिक स्तरावर काय लाभ मिळणार, असे प्रश्न माजी नगरसेवकांकडून उपस्थित केले जात आहेत.
पालिका प्रशासन आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांमध्ये या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. या माध्यमातून पालिका रुग्णालयांत अत्यावश्यक आणि प्रगत सुविधा पुरवणे शक्य होईल.
— डॉ. दीपा शुक्ल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.