शंकरपाड्यातील विद्यार्थ्यांचा अंतराळात ठसा
नासाच्या ‘अर्टेमिस-२’ मोहिमेत २७४ विद्यार्थी, ११ शिक्षकांचा सहभाग
कासा, ता. १२ (बातमीदार) ः ‘नासा’च्या ‘अर्टेमिस-२’ चांद्रमोहिमेत डहाणू तालुक्यातील शंकरपाडा शाळेतील २७४ विद्यार्थी, ११ शिक्षकांची नावे चंद्राच्या कक्षेत पाठवली जाणार आहेत. नासाकडून अधिकृत बोर्डिंग पास प्रदान केले असल्याने विद्यार्थ्यांनी अंतराळात ठसा उमटवला आहे.
२०१९-२० मधील मंगळ (मार्स) मोहिमेनंतर ‘अर्टेमिस-२’ या चांद्रमोहिमेत शंकरपाडा शाळेने मानाचा सहभाग नोंदवला आहे. नासाच्या ‘सेंड युवर नेम टू द मून’ या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत जगभरातील नागरिकांची नावे डिजिटल स्वरूपात अंतराळात पाठवली जातात. या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेने अधिकृत पोर्टलवर नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना बोर्डिंग पास देण्यात आले असून, त्यांचे वितरण करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारप्राप्त शिक्षक विजय हणमंतराव वाघमारे यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्डमध्ये संग्रहित करून ‘ओरियन’ यानाद्वारे चंद्राभोवतीच्या मोहिमेत पाठवली जाणार आहेत. या मोहिमेचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहण्याची संधी मिळणार आहे.
-------------------------------------
५४ वर्षांनंतर चंद्राकडे झेप
‘अर्टेमिस-२’ मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित होणार आहे. दहा दिवसांची ही मोहीम पूर्ण करून अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पॅसिफिक महासागरात परत येणार आहेत. तब्बल ५४ वर्षांनंतर मानवाची पुन्हा चंद्राकडे झेप असणार आहे. या मोहिमेत रीड वायसमन, विक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन हे चार अंतराळवीर सहभागी होणार असून, भविष्यातील चंद्रावरील मानवी मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी या मोहिमेत केली जाणार आहे.
----------------------------
विज्ञानाची गोडी लागणार
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना या उपक्रमामुळे मिळेल. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल, असे मत गटशिक्षणाधिकारी संजय वाघ यांनी व्यक्त केले. तर डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान समृद्धी कार्यक्रमामुळे विज्ञानाची गोडी निर्माण झाल्याचे शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.