सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : जनतेच्या पैशांची लूटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. नवी मुंबईत आज (ता. १२) नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला. या दरम्यान नाईक हे अधिकाऱ्यांवर संतापल्याचे दिसून आले. २० फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासक राजवटीत झालेल्या विकासकामांची श्वेतपत्रिका काढण्याचा ठराव भाजपच्या नगरसेवकांनी मांडला आहे. त्या प्रश्नावर उत्तर देताना नाईक यांनी नगरसेवकांच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच पैशांची लूटमार कोणी केली आणि कोणाच्या आदेशावरून केली, अशांचे चेहरे सर्वांसमोर यायला हवेत, असा दावा केला.
नवी मुंबई महापालिकेतील विकासकामांवरून भाजप आणि शिवसेनेत सुरू झालेली तू तू-मैं मैं आणखी वाढणार आहे. गणेश नाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत जनता दरबारात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नवी मुंबई महापालिकेत नगररचना, अभियांत्रिकी आणि आरोग्य या विभागांत झालेली विकासकामे आणि घेतलेल्या निर्णयांची श्वेतपत्रिका काढून चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. या मुद्द्यांच्या आडून सत्ताधारी विरोधी बाकावरील शिवसेनेच्या शिंदे गटाला अडचणीत आणण्याची खेळी खेळत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या डावपेचावर अद्याप विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेली नाही.
वाशीत गुरुवारी झालेल्या जनता दरबाराच्या ठिकाणी गणेश नाईक यांनी प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांवरून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जनतेच्या पैशांची लूटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना आदेश कोणी दिले आणि का दिले, ही बाब समोर आली पाहिजे. अशा लोकांवर फौजदारी कारवाई करेन, असा इशारा नाईक यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिला. याप्रसंगी महापालिका, सिडको आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
बेकायदा इमारतींवर कारवाई करा
घणसोली येथे सिडकोतर्फे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाबाबत नाईक यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यापेक्षा खरंच बेकायदा इमारती बांधणाऱ्यांवर कारवाई करून दाखवा, असा इशारा नाईक यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिला.
जनतेला त्रास देणाऱ्यांची हयगय नाही
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सोसायटीतील शिष्टमंडळ जनता दरबारात आले होते. त्यांना परवानगी मिळत नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाईक यांनी संताप व्यक्त केला. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करा, असे आदेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिले. तसेच जनतेला त्रास देणाऱ्यांची हयगय करणार नाही, असे बोलत नाईक यांनी त्यांच राग व्यक्त केला.
जनता दरबार यापुढेही सुरूच राहणार
नवी मुंबई हे माझे शहर आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी समरस होण्यासाठी जनता दरबार घेत असतो. त्यामुळे नवी मुंबईत दर महिन्याला जनता दरबार होत राहील, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. आता नागरिकांची कामे होत आहेत याचा अर्थ प्रशासनाचे अधिकारी जनतेची कामे करू लागले आहेत. ज्या दिवशी जनता दरबारात गर्दी कमी होईल, नागरिक अजिबात येणार नाहीत तेव्हा जनता दरबार घेण्यामागचा हेतू सफल झाला असे म्हणता येईल, असे नाईक यांनी सांगितले.
विरोधकांनी श्वेतपत्रिकेचे समर्थन करावे!
नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढण्यामुळे विरोधकांना अडचणीत आणण्याचा संबंध नाही. उलट जनतेच्या पैशांची लूटमार करणाऱ्यांचे चेहरे उजेडात आणायचे आहेत. विरोधकही जनतेचे प्रतिनिधी असल्याने त्यांनी ही श्वेतपत्रिका काढण्याचे समर्थन करावे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.