‘हर हर महादेव’चा तिळसेत गजर
हजारो शिवभक्तांची उपस्थिती, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
वाडा, ता. १५ (बातमीदार) ः तालुक्यातील तिळसेश्वरातील महादेवाच्या दर्शनासाठी नारे, कोंढले, घोडमाळ, गातेस, सापने, कुडूस येथील भाविकांनी एकच गर्दी केली होती. या वेळी ‘हर हर महादेव’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदमून गेला होता.
तिळसेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात देवमासे आहेत. या डोहातील मासे बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यात्रेतील भाविकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाणी, सरबत, शिवसेनेच्या वतीने फराळाची मोफत सोय केली होती. या वेळी वाडा आगारातून पाच-दहा मिनिटांनी बसची व्यवस्था होती. तसेच ग्रामस्थांकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी हजारो भाविक आल्याने स्थानिकांसाठी रोजगाराचे साधन मिळाले.