प्रभादेवीत शिवकालीन नाणी व ऐतिहासिक खेळांचे प्रदर्शन
प्रभादेवी, ता. १८ : इतिहासप्रेमी आणि नागरिकांसाठी आकर्षण ठरणारे शिवकालीन नाणी व ऐतिहासिक खेळांचे विशेष प्रदर्शन प्रभादेवीत भरविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभा विनायक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रभादेवी येथील प्रभाविनायक सोसायटीच्या आवारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शिवकालीन नाण्यांचा दुर्मिळ संग्रह नागरिकांना पाहता येणार असून, त्या काळातील आर्थिक व्यवहार आणि इतिहासाची माहितीही देण्यात येणार आहे.
या वेळी प्रभादेवी परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांची आरती व श्लोक पठण करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.
‘आपला कट्टा’ या उपक्रमांतर्गत दरवर्षी “चला खेळ खेळूया” मोहिमेद्वारे जुने पारंपरिक मैदानी व बैठे खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. या पारंपरिक खेळांचे महत्त्व समजावून सांगत ते पुन्हा खेळले जावेत, यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
बैठ्या खेळांमध्ये भारतातील कालबाह्य झालेले ऐतिहासिक खेळ जसे की चतुरंग, पच्चीसी, पट, मोक्षपट, चल्ल्सआठ, काच कांगारीया, सागर गोटे, विमानम, अदुहुली, बाघचाल, नवकंकारी, प्रेतवा, पगडी पट यांसह परदेशातील लुडस, बाव, सिनेट आदी खेळांचे पट आणि त्यांची माहिती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना ऐतिहासिक खेळांची ओळख व्हावी आणि त्यातून त्यांना मैदानी खेळांचा आनंद मिळावा, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे समितीचे किरण परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.