अतिदुर्गम भागातील रेशन सक्षमीकरणात तलासरी तालुका जिल्ह्यात अव्वल
युनिट पद्धती, शिधापत्रिका रंगवर्गवारी व डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शक धान्यवाटप; २८ हजारांहून अधिक कुटुंबांना लाभ
तलासरी, ता. १९ (बातमीदार) : अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलासरी तालुक्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत उल्लेखनीय कामगिरी करीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिधापत्रिका सक्षमीकरण, आधार सीडिंग, ऑनलाइन नोंदणी, डिजिटल धान्यवाटप आणि नियमित पुरवठा या सर्व बाबींमध्ये तालुक्याने आदर्श कामगिरी केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात एकूण २८,१३५ शिधापत्रिकाधारक कुटुंबे असून सर्व पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे धान्यवाटप केले जात आहे. यासाठी तालुक्यात ६९ रास्त भाव धान्य दुकाने कार्यरत असून सर्व दुकाने आधुनिक डिजिटल मशीन प्रणालीने सुसज्ज करण्यात आली आहेत. रेशन प्रणालीमध्ये शिधापत्रिकेचा रंग हा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. पिवळे शिधापत्रिका (एएवाय), अतिगरीब व अत्यंत गरजू कुटुंबांसाठी, केशरी शिधापत्रिका (पीएचएच) कमी उत्पन्न गटासाठी, तर पांढरे शिधापत्रिका (एपीएल) मध्यम उत्पन्न गटासाठी दिली जाते. या वर्गवारीनुसार धान्याचे दर, प्रमाण आणि अनुदान निश्चित केले जाते. रेशन वितरणात कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक युनिट मानून धान्याचे प्रमाण निश्चित केले जाते. अंत्योदय योजना (एएवाय)अंतर्गत प्रति कुटुंब दरमहा सुमारे ३५ किलो धान्य वितरित केले जाते. प्राधान्य कुटुंब (पीएचएच) लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो धान्य (साधारण तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू) दिले जाते. तर एपीएल म्हणजेच पांढरे कार्डधारकांना शासनाच्या दरानुसार मर्यादित प्रमाणात धान्य मिळते. तसेच दुर्गम भौगोलिक परिस्थिती असूनही प्रभावी अंमलबजावणीमुळे तलासरी तालुक्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
------------------------
डिजिटल प्रणालीमुळे वाढली पारदर्शकता
पूर्वी हाताने शिधापत्रिकेत नोंद करून धान्यवाटप केले जात होते; मात्र आता बहुतांश ठिकाणी बायोमेट्रिक अंगठा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आली आहे. लाभार्थ्याचा अंगठा स्कॅन केल्यानंतर मशीनमधून पावती निघते आणि त्यानुसार धान्य दिले जाते. पूर्वी दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कअभावी अडचणी येत होत्या; मात्र आता नेटवर्क सुविधा उपलब्ध झाल्याने सर्व ६९ दुकाने पूर्णपणे ऑनलाइन प्रणालीवर कार्यरत झाली आहेत.
---------------
प्रशासनाचा दावा; जिल्ह्यात प्रथम क्रमांक
शिधापत्रिका आधार सीडिंग, ऑनलाइन नोंदणी, नियमित धान्यवाटप, डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर आणि तक्रार निवारण या सर्व बाबींमध्ये तलासरी तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या उपक्रमामुळे अतिदुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांनाही योग्य दरात नियमित अन्नधान्य मिळत असून शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
शिधापत्रिका वर्गवारीनुसार लाभार्थी संख्या
राष्ट्रीय अंत्योदय अन्न योजना (पिवळे कार्ड) : ८,९६४ कुटुंबे
प्राधान्य कुटुंब (केशरी कार्ड) : १७,८०९ कुटुंबे
एनएफएसएअंतर्गत अपात्र / मध्यम कुटुंब : १,३६२ कुटुंबे
पांढरे कार्ड (मध्यमवर्गीय) : ७६५ कुटुंबे
------------------------
कोट
तालुक्यात साधारणतः ९९ टक्के शिधापत्रिकेसंदर्भात सर्व ऑनलाइन कामे ही पूर्णतः झाली आहेत. पालघर जिल्ह्यात आमचा तालुका याबाबतीत प्रथम क्रमांकावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच सर्व रेशनधारकांना नियमित रेशन धान्य हे बायोमॅट्रिक पद्धतीने वाटप केले जाते.
- निशांत सीडाम, तालुका अन्नपुरवठा अधिकारी, तलासरी
कोट
आम्हाला नियमित रेशन धान्य बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे दिले जाते. त्यामुळे आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकरी मजूरवर्गाला रेशन धान्यवाटपाचा आधार आहे.
- मिथुन वाडिया, रेशनधारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.