मुलांनी घेतली ऐतिहासिक खेळांची अनोखी मजा
प्रभादेवी, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक खेळांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांनी कुतूहलाने विविध पारंपरिक खेळांची माहिती घेत त्यांचा मनसोक्त आनंद लुटला.
प्रभाविनायक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रभादेवी येथील प्रभाविनायक सोसायटीच्या आवारात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प आणि पेटती ज्योत हे विशेष आकर्षण ठरले. महाराजांच्या प्रतिमेसमवेत छायाचित्र घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
ढोल-ताशांच्या गजरात महिला, पुरुष आणि बालकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत पालखीतून परिसरात राजांची भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला.
आजच्या मोबाईलच्या युगात मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत असताना मुलांना पारंपरिक आणि ऐतिहासिक खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाला पालक व नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला.
बैठ्या खेळांमध्ये भारतातील अनेक प्राचीन व कालबाह्य होत चाललेले खेळ - चतुरंग, पच्चीसी, पट, मोक्षपट, चल्लसआठ, काच कांगारिया, सागरगोटे, विमानम, अदुहुली, बाघचाल, नवकंकरी, प्रेतवा, पगडीपट, तसेच परदेशातील लुडस, बाव आणि सिनेट यांसारख्या जुन्या खेळांचे पट व त्यांची सविस्तर माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
या उपक्रमामुळे नव्या पिढीला आपल्या समृद्ध खेळ परंपरेची ओळख करून देण्यास हातभार लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.