शिवजयंतीनिमित्त शिरवणेतील युवकांकडून बेलापूर किल्ल्याची स्वच्छता व सजावट; उत्साहात शिवजयंती साजरी
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : शिवजयंतीनिमित्ताने शिरवणे गावातील शिवप्रेमी युवकांनी ऐतिहासिक बेलापूर किल्ला येथे स्वच्छता मोहिम राबवली. स्वच्छतेनंतर किल्ल्याची सजावट करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकसहभागातून इतिहास संवर्धनाचा आदर्श उपक्रमाचे परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गुरुवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिरवणे गावातील युवकांनी किल्ल्यावर एकत्र येत स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. किल्ल्याचा परिसर, बुरुज आणि टेहळणी बुरुज झाडून स्वच्छ करण्यात आले. परिसरातील छोटे दगड, खुरटी गवते व कचरा हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर किल्ल्यावर भगवे झेंडे व पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून घोषणाबाजी व शिवगर्जना करत शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या उपक्रमात प्रभाकर ठाकूर, भरत ठाकूर, श्रीकांत भोईर, भानुदास भोईर, दीपक ठाकूर, दिनेश ठाकूर, प्रमोद भोईर, महेश पाटील, जीवन भोईर, जितेश म्हात्रे, चिराग भोईर आदी शिवप्रेमी युवक उपस्थित होते.
बेलापूर किल्ल्याचा इतिहास
इतिहासानुसार हा किल्ला सिद्दींकडून बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. नंतर तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. त्या काळात किल्ल्याला पाच बुरुज व मजबूत तटबंदी होती. बालेकिल्ला सुमारे ७५ फूट उंचीवर असून गडावर सुमारे २० तोफा होत्या.
३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला आणि २२ एप्रिल १७३७ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युद्धानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रे यांनी याच किल्ल्यात पकडल्याची नोंद आढळते. पुढे इंग्रज व मराठे यांच्यातील संघर्षात किल्ल्याचा ताबा अनेकदा बदलला आणि अखेर २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रेने किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.
सध्या किल्ल्याची तटबंदी बहुतांश नष्ट झाली असली तरी बालेकिल्ल्यावरील इमारतींचे अवशेष, दुमजली गोल मनोरा तसेच आतून वर जाणारा गोलाकार जिना आजही पाहायला मिळतो. किल्ल्यावर गोवर्धनी मातेचे जीर्णोद्धारित मंदिर असून रेतीबंदर परिसरात पोर्तुगीजकालीन तलाव व चौकोनी विहिरींचे अवशेषही आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.