वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
प्राप्त पुरुषोत्तम पाटील यांचे निधन
विरार ता. २० (बातमीदार)ः वसई तालुक्यातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त पुरुषोत्तम पांडुरंग पाटील तथा विष्णू अण्णा पाटील यांचे आज वयाच्या ९५व्या वर्षी पहाटे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा आणि चार मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’च्या वसईतील ॲग्रोवन वृत्तपत्राचे औपचारिक प्रकाशन त्यांच्या हस्ते देवतलाव येथे झाले होते. त्यांना राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता, त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
............
शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून वसईला शेतीच्या क्षेत्रात राज्याच्या नकाशावर त्यांनी आणले होते. शेतीबरोबर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातदेखील भरीव कामगिरी केली. विरारच्या उत्कर्ष विद्यालयाला त्यांनी देणगी दिली होती. उत्कर्ष विद्यालयातूनच पुढे विवा महा विद्यालय, विवा इंजिनिअरिंग कॉलेज, आणि इतर वास्तूज दिमाखात उभ्या आहेत. त्यांच्या निधनाने शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राची हानी झाली आहे.
- हितेंद्र ठाकूर, माजी आमदार
...........
वसईच्या कृषी क्षेत्राला संजीवनी देऊन त्यात वेगवेगळे प्रयोग करणारे आमचे मार्गदर्शक आमच्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सकाळच्या ॲग्रोवन दैनिकाचे वसईतील प्रकाशन आमच्या शेतकरी सोसायटीच्या सभागृहात झाले होते. त्यांना शेतकरी सोसायटीतर्फे आदरांजली.
- आशय राऊत, चेअरमन, वसई शेतकरी सोसायटी