संगीतकार तुतूल यांचे निधन
मुंबई, ता. २० ः हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार बाबी-तुतूल या लोकप्रिय जोडीतील तुतूल यांचे दहिसर येथील त्यांच्या राहत्या घरी आज शुक्रवारी (ता. २०) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर काशिमिरा येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
तुतूल यांचे खरे नाव सुदिप्तो भट्टाचार्य असे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संगीत, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. तुतूल यांनी बाबी यांच्यासोबत बाबी-तुतूल या जोडीच्या माध्यमातून अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिले. या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत आधुनिक, प्रयोगशील आणि वेगळ्या धाटणीचे संगीत सादर करून स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘भूत’, ‘एक हसीना थी’, ‘खोसला का घोसला’ आणि ‘सरकार राज’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या संगीताने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भयपट, थ्रिलर तसेच आशयप्रधान चित्रपटांसाठी दिलेले पार्श्वसंगीत ही त्यांच्या कामाची ठळक ओळख होती. हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही तुतूल यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘वेड लावी जीवा’, ‘दुभंग’ आणि ‘संघर्ष’ या मराठी चित्रपटांच्या संगीतामुळे त्यांनी मराठी प्रेक्षकांमध्येही आपली वेगळी छाप पाडली. तुतूल यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक प्रयोगशील, मेहनती आणि सर्जनशील संगीतकार गमावला आहे. त्यांचे सूर आणि आठवणी रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील.