महापालिकेचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला होणार सादर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २५ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, ८ मार्च २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या खर्चाचा हिशेब द्या, कोणाला किती निधी दिला याबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. २०२५ ते २०२६चा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्या वेळी प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, आता मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे ४ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणारा पालिकेचा अर्थसंकल्प आता २५ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्यामुळे २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.