वसई-विरारमध्ये प्रदूषणाचा विळखा
प्रदूषणमापन यंत्रे बसवण्याचे आदेश हवेतच; महापालिकेची कारवाई कागदावरच
विरार, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहरात सध्या खासगी गृहनिर्माण प्रकल्पांचा ‘धुरळा’ उडाला असून, वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडत आहे. बांधकामस्थळांवर हवा गुणवत्तामापन यंत्रे बसवण्याचे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देऊनही, विकसकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने केवळ नोटिसांचा सोपस्कार पार पाडल्याने शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक दिवसेंदिवस खालावत चालला आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. बांधकाम साहित्याची वाहतूक आणि प्रत्यक्ष कामामुळे वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरते. तसेच, रात्री-अपरात्री चालणाऱ्या यंत्रांच्या कर्णकर्कश आवाजामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. एक्यूआय ॲपनुसार, गेल्या आठवड्यात वसईतील हवेची गुणवत्ता ९४ ते १२० दरम्यान नोंदवण्यात आली असून ती मध्यम प्रदूषित श्रेणीत मोडते.
आदेशाची पायमल्ली
वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी प्रणाली बसवणे अनिवार्य करण्यात आले होते. यामुळे कोणत्या ठिकाणी किती प्रदूषण होत आहे, याची नेमकी माहिती प्रशासनाला मिळणे सोपे झाले असते; मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही बहुतांश विकसकांनी ही यंत्रणा बसवलेली नाही. महापालिकेने यापूर्वी अनेक विकसकांना नोटिसा बजावल्या होत्या; परंतु कडक कारवाईच्या अभावामुळे विकसक या नियमांना जुमानत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
वाढत्या प्रदूषणामुळे शहरात श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रशासकीय ढिसाळपणामुळे सामान्य नागरिकांना आरोग्याची किंमत मोजावी लागत आहे. यासंदर्भात पालिकेच्या नगररचना अधिकारी श्वेता माने यांनी सांगितले, की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकसकांना यापूर्वी नोटिसा पाठवल्या आहेत. आता पुन्हा एकदा सर्वेक्षण करून अशा प्रकल्पांवर प्रत्यक्ष कारवाईची मोहीम राबवण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.