बेलापूर, ता. २२ (बातमीदार) : होळी, धुलिवंदन सणाला अवघा आठवडा शिल्लक असताना वाशी एपीएमसी बाजारासह नवी मुंबईतील लहान मोठ्या सर्वच बाजारपेठा विविध रंग, पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत. बाजारात मागणीदेखील वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. विशेषतः विविध आकारातील पिचकाऱ्या बालचमूंना आकर्षित करू लागल्या आहेत.
बच्चेकंपनीच्या आवडीचा सण म्हणजे होळी. होळीला पुरणपोळीवर ताव मारून दुसऱ्या दिवशी रंगपंचमीनिमित्त एकमेकांवर रंगांची उधळण करत विविध रंगात रंगून जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत या पाच ते सहा दिवसांत कुठे दोन दिवस, तर कुठे पाच दिवस होळी हा उत्सव साजरा केला जातो. बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागात होळीला जावई व आप्तेष्टांना साखेरचे हार कंगण दिले जाण्याची परंपरा आहे. यामुळे बऱ्याच बाजारपेठांमध्ये रंग, पिचकारी, फुगे यांसोबत साखरेचे हार कंगणसुद्धा दाखल झाले आहेत. बाजारात ७० ते ९० रुपये किलोप्रमाणे याचे भाव आहेत.
बच्चेकंपनींमध्ये कार्टून पिचकाऱ्यांची क्रेझ
बच्चेकंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात स्पायडर मॅन, छोटा भीम, अँग्री बर्ड, डोरेमॉन आणि डोरा कार्टूनच्या पिचकाऱ्यांची बाजारात सध्या चलती दिसत आहे. उपलब्ध कार्टून पिचकाऱ्यांच्या किमती १०० रुपये ते १२०० रुपयांपर्यंत आहेत, तर जास्तीत जास्त पाणी राहू शकेल, अशा नवीन आकार आणि डिझाइनच्या स्कूल बॅग पिचकाऱ्यांना देखील बच्चेकंपनीकडून सर्वाधिक मागणी आहे, तर दुसरीकडे तरुणांसाठी स्मोक गन, कलर टँक या काळानुरूप बदलत्या ट्रेंडच्या साहित्यांचीदेखील उपलब्धता बाजारात आहे. यामध्ये कलर टँकची सर्वाधिक मागणी आहे.
नैसर्गिक रंगांसाठी बचत गटांचा पुढाकार
धुलिवंदनासाठी साध्या रंगांसोबत नैसर्गिक रंगही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासाठी बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. अनेक महिला आणि अन्य काही विक्रेत्यांनी स्टॉल लावत नैसर्गिक रंगांबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, तर यंदा नैसर्गिक रंग खरेदी करण्यासाठी अधिक नागरिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. त्यांची मागणी वाढल्यामुळे दरातदेखील वाढ झाली आहे.
रंग, पिचकारी दर (रुपयांमध्ये)
नैसर्गिक रंग ६० ते २००
साधारण रंग ५० ते २००
पिचकारी ९० ते १२००
कलर टँक १,४५० ते २ हजार
पुरणपोळीच्या साहित्याचे दर वाढतेच
होळी म्हटले की, पुरणपोळी आलीच, मात्र ही पुरणपोळी बनवण्यासाठी घराघरात गृहिणींकडून मोठे कष्ट घेतले जातात. वाशी एपीएमसी बाजारात अन्य किराणा दुकानात पुरणपोळीच्या साहित्यांचे दर वाढलेले आहेत. गृहिणींना याचा काहीसा फटका बसत आहे.
पुरणपोळीचे साहित्य दर (रुपयांमध्ये)
साखर ५०
नारळ (प्रतिनग) ४५
गूळ ८०
चणाडाळ ९६
तेल (लिटर) १६० ते १८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.