मुंबई

दिव्यांगांसाठी आरोग्यवर्धक पार्क

CD

दिव्यांगांसाठी ‘आरोग्यवर्धक पार्क’
सहा कोटी २४ लाखांचा निधी मंजूर; अत्याधुनिक सोयीसुविधांसह शारीरिक व्यायामावर भर
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २२ : वसई-विरार शहरातील दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याला बळ देण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. शहरात वास्तव्य करणाऱ्या पाच हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांसाठी आरक्षण क्रमांक ३६१ येथे सहा कोटी २४ लाख रुपये खर्चून विशेष ‘दिव्यांग पार्क’ची निर्मिती करण्यात येणार आहे.

केवळ फिरण्यासाठीच नव्हे, तर दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी हे उद्यान मैलाचा दगड ठरणार आहे. या पार्कमध्ये दिव्यांगांना मुक्त वातावरणात आनंद घेता यावा, तसेच योग आणि शारीरिक व्यायाम करणे सुलभ व्हावे, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. फिजिओथेरपी आणि व्यायामाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सुदृढ आरोग्याला यामुळे बळ मिळणार आहे. महापालिका केवळ उद्यानावरच थांबली नसून, दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीही प्रयत्नशील आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात ८२ दिव्यांगांना नोकरी मिळाली असून, आता डिजिटल शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि बचत गटांच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी केले जात आहे.

दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन या उद्यानाची रचना अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे. प्रत्येक घटकात सुलभता, सुरक्षितता आणि स्वावलंबन यांना प्राधान्य देण्यात आले आहे. उद्यानात दिव्यांग अनुकूल खेळांची विशेष साधने बसविण्यात आली असून, ती विविध प्रकारच्या शारीरिक क्षमतांना अनुरूप अशी डिझाइन करण्यात आली आहेत. त्यामुळे दिव्यांग मुलांना आणि युवकांना खेळताना आत्मविश्वास व आनंद अनुभवता येईल. फ्रेंडली पाथवे हे या उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. व्हिलचेअर वापरणाऱ्या तसेच चालण्यात अडथळे असलेल्या व्यक्तींना सहजपणे फिरता यावे यासाठी रुंद, समतल आणि अडथळामुक्त मार्ग तयार करण्यात आले आहेत.

दृष्टिहीनांसाठी विशेष स्पर्शज्ञान पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांमुळे स्पर्शाच्या माध्यमातून दिशादर्शन मिळते आणि उद्यानात स्वतंत्रपणे फिरणे अधिक सोपे होते. श्रवण दिव्यांगांसाठी ध्वनीसह दृश्य सूचनाफलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यक सूचना स्पष्टपणे समजाव्यात यासाठी दृश्य माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उद्यानात योग केंद्र, फिजिओथेरपी विभाग आणि सुलभ शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधा दिव्यांगांसाठीच नव्हे, तर सर्व नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, विशेष सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या प्रत्येकासाठी सुरक्षित आणि निश्चिंत वातावरण निर्माण होईल.

अत्याधुनिक सुविधा
उद्यानाची रचना करताना दिव्यांगांच्या प्रत्येक गरजेचा विचार करण्यात आला आहे.
दिव्यांग अनुकूल खेळ : विशेष डिझाइन केलेली खेळाची साधने.
फ्रेंडली पाथवे : व्हीलचेअर आणि चालण्यास अडथळा येणार नाही असे रस्ते.
दृष्टिहीनांसाठी सोय : स्पर्शज्ञानाद्वारे मार्गदर्शन करणारे विशेष पट्टे.
श्रवण दिव्यांगांसाठी : ध्वनीसह दृश्य स्वरूपातील सूचनाफलक.
आरोग्य सुविधा : योग केंद्र, फिजिओथेरपी विभाग आणि सुलभ शौचालय.
सुरक्षा : सीसीटीव्ही कॅमेरे आणि विशेष सुरक्षा रक्षक तैनात असतील.


वसई-विरार महापालिका दिव्यांगांसाठी विविध योजना राबवत आहे. त्यांना मुक्त वातावरणाचा आनंद मिळावा आणि व्यायाम करता यावा, यासाठी हे सर्व सुविधांनी युक्त पार्क उभारले जाणार आहे.
-मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त

शहरात दिव्यांग पार्क ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येईल. या उद्यानांचा लाभ जास्तीत जास्त बांधवांना मिळावा, यासाठी प्रशासनाला तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या जातील.
- अजीव पाटील, महापौर

प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. दिव्यांगांना या उद्यानाचा मोठा लाभ होईल. ही संकल्पना शहरात ठिकठिकाणी राबवून जास्तीत जास्त उद्याने विकसित करावीत.
- देविदास केंगार, संस्थापक अध्यक्ष, अपंग जनशक्ती संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT