पीएम श्री शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ
श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्र. १ मध्ये भंगाराचा ढीग, सर्पांचा वावर; पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
श्रीवर्धन, ता. २३ (वार्ताहर) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पीएम श्री योजनेसाठी मार्च २०२३ मध्ये निवड झालेल्या श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आधुनिक, सुरक्षित व आदर्श शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निकषावर निवड झालेल्या या शाळेच्या आवारातच धोकादायक भंगार टाकण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अंगणवाडीपासून इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत सुमारे २०७ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
शाळेच्या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून नगरपरिषदेचे गंजलेले लोखंडी कपाट, सळ्या, रॅबीट तसेच वापरात नसलेली सडलेली मैला टाकी पडून आहे. या भंगारात वारंवार सर्प शिरल्याच्या घटना घडल्या असून, वर्ग सुरू असतानाच चार ते पाच वेळा साप आढळल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रवेशद्वाराजवळील फाटकाची दुरवस्था झाल्याने मोकाट गुरे मैदानात वावरत असून, शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
याशिवाय शाळेच्या आवारातील पाणी साठवण टाकी व जलवाहिनीला गळती लागल्याने परिसरात पाणी साचत आहे. याच ठिकाणी मुलांसाठी घसरगुंडी व सी-सॉ सारखी खेळणी बसविण्यात आल्याने मुले पाण्यात खेळताना दिसतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अनंत गुरव यांनी भंगार विल्हेवाटीसाठी निविदा काढण्यात येईल, पाणी गळती दुरुस्त केली जाईल व गुरेढोरे रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.
चौकट
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज
पीएम श्री योजनेत समावेश झालेल्या शाळेतच अशा प्रकारे धोकादायक परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. भंगार तत्काळ हटविणे, मजबूत कंपाउंड व सुरक्षित प्रवेशद्वार उभारणे, पाणीगळती थांबविणे आणि नियमित स्वच्छता व देखभाल करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सुरक्षित व आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण करावे, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.
प्रतिक्रिया :
विद्यार्थ्यांची सुरक्षितता या दृष्टीने आम्ही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, शिक्षण सभापती यांच्याशी चर्चा केली आहे. शाळेच्या आवारातील भंगार, पाण्याच्या टाकीला लागलेली गळती, आवारात शिरणारी गुरेढोरे व सर्पांचा वावर या चिंताजनक गोष्टी आहेत. लवकर उपाययोजना आखण्यात याव्यात.
- गणेश सुरेश कुडगावकर
श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक एक, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.