मोतीलाल ओसवाल सदर २४ फेब्रुवारीसाठी
..........................................................
लॉरेस लॅब : लक्ष्य - १,२३०
........................................
लॉरेस लॅबला मिळू लागलेले चांगले उत्पन्न हे बिगर एआरव्ही फॉर्म्युलेशनच्या वाढत्या जोरदार विक्रीमुळे होत आहे. विकसित बाजारपेठांमधून चांगली मागणी येत असल्यामुळे अनिश्चित अशा एआरव्ही विभागावरील त्यांचे अवलंबित्व कमी होत आहे आणि त्यांची नफाक्षमता आणि विक्री स्थिर होत आहे. या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत २५.७ % वाढून १७.८ अब्ज रुपये झाला (मागील वर्षी १६.६ अब्ज रुपये). ढोबळ नफाक्षमता चार टक्क्यांनी वाढून ६०.९ वर गेली आणि ईबीआयटीडीए नफाक्षमता ७.३० टक्क्यांनी वाढून वार्षिक २५.७% वर गेली. त्यामुळे ईबीआयटीडीएची वाढ ७१.३ % ने होऊन तो ४.९ अब्ज रुपयांवर पोहोचला. सीडीएमओ प्रकारच्या औषधांची विक्री, मानवी आणि पशु आरोग्य क्षेत्रात वाढत असून जनरिक क्षेत्रातील भांडवली खर्च योग्य मार्गावर आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२६ ते २०२८ दरम्यान त्यांचे उत्पन्न वार्षिक चक्रवाढ १६ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
टाटा स्टील : लक्ष्य - २४०
............
भारतातील स्टीलची मागणी आर्थिक वर्ष २०२६ ते २०३० दरम्यान ८ ते १० टक्के वाढणार असल्याने त्याचा फायदा टाटा स्टीलला होईल. त्याचप्रमाणे सरकारच्या धोरणात्मक उपायांचाही लाभ त्यांना मिळेल. टाटा स्टील आपल्या कलिंगनगर आणि एन.आय.एन.एल. येथील प्रकल्पांचा विस्तार करत असल्याने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये असलेले त्यांचे २६.५ मॅट्रिक टनांचे उत्पादन २०३१ पर्यंत दरवर्षी ४० लाख मॅट्रिक टनांपर्यंत जाईल. अशा स्थितीत उत्पादन वाढल्याने त्यांचे उत्पन्नही वाढण्याच्या अवस्थेत आहे. स्टीलच्या आयातीविरोधात करांचे असलेले संरक्षण, स्टीलची घटलेली आयात, कठीण स्टीलच्या किमतीतील होणारी वाढ (टनांमागे ४७,५०० हजार रुपयांवरून ५३,५०० रुपयांपर्यंत), चीनने पोलादाच्या उत्पादनावर निर्बंध घातल्याने टाटा स्टीलला होणारा फायदा, तर युरोपात पोलाद उत्पादनादरम्यानच्या प्रदूषणासंदर्भातील उपाययोजना व त्याबाबत ठरवून दिलेला कोटा यामुळे किमती वाढून त्याचा फायदा टाटा स्टीलला होईल. टाटा स्टीलचा युरोपातील तोटा अत्यंत वेगाने कमी होत असून आता तेथून नफा होणे दृष्टिपथात आहे. अशा स्थितीत घरगुती पातळीवर त्यांची अवस्था अत्यंत मजबूत असताना तसेच किंमतवाढ आणि उत्पादनवाढ होत असताना आणि युरोपात व्यवसायाची अवस्था सुधारत असताना, कंपनीबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक झाला आहे.
इंडियन बँक : लक्ष्य - १०२५
............
इंडियन बँकेने या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित अपेक्षेनुसार चांगली कामगिरी केली आहे. नफाक्षमता वाढत असून त्यांना या तिमाहीत ३०.६ अब्ज रुपयांचा करोत्तर नफा झाला. तो मागील वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा सात टक्के जास्त होता. निव्वळ व्याजाच्या उत्पन्नात सात टक्के वाढ झाली, तर त्यांनी दिलेली कर्जे मागील वर्षीच्या तुलनेत १५.४% वाढली. त्यांच्या मालमत्तेची गुणवत्ताही सुधारत असून ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए हे अनुक्रमे २.२३% आणि ०.१५% एवढे राहिले आहेत. कर्जांसाठी त्यांनी पुरेशी तरतूद केली असून एसएमए-एक श्रेणीतील तरतूदही वाढवली आहे. त्यामुळे त्यांच्या ताळेबंदाची अवस्थादेखील मजबूत झाली आहे. कर्ज आणि ठेवी यांचे गुणोत्तर ७९.१% असतानादेखील रोख प्रवाह पुरेसा आहे. ठेवींमध्ये वार्षिक १२.६% वाढ झाली असताना आणि सीएएसए रेशो ३७.४% असताना बँकेच्या उत्पन्नाचा अंदाज आर्थिक वर्ष २०२७ आणि आर्थिक वर्ष २०२८ मध्ये अनुक्रमे ४ आणि ४.५ टक्के वाढला आहे, तर आर्थिक वर्ष २०२७-२८ मधील रिटर्न ऑन असेट आणि रिटर्न ऑन इक्विटी हे अनुक्रमे १.४% आणि १७.८% एवढे होण्याची अपेक्षा आहे.
संवर्धन मदरसन : लक्ष्य - १४८
............
संवर्धन मदरसन इंटरनॅशनलला उच्च दर्जाच्या उत्पादनांची विक्री, विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये केलेले संक्रमण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि अंतराळ-अवकाश या विभागात केलेला प्रवेश, जगातून येणाऱ्या मोठ्या ऑर्डर आणि ओसाड जमिनीवर (ग्रीनफिल्ड) उभारलेले प्रकल्प व शिस्तबद्धरीत्या केलेले अन्य कंपन्यांचे विलीनीकरण आणि घेतलेला ताबा यांचा फायदा होत आहे. जगात वाढणाऱ्या वाहनांच्या मागणीमुळे त्यांची विक्री वाढते आहे. त्यांची यावर्षीची महसुलातील वाढ ही अपेक्षेनुसारच असून ती मागील वर्षीपेक्षा १३.५% वाढवून ३१४.१ अब्ज रुपयांपर्यंत गेली. व्यवसायाची होणारी नैसर्गिक वाढ, अन्य कंपन्यांचा घेतलेला ताबा तसेच परकीय चलन विनिमय दरातील बदल यांचा फायदा त्यांना होत असून कामगार कायद्यात नव्या तरतुदी आल्या तरीही त्यांची नफाक्षमता स्थिर राहिली आहे. व्यवस्थापनाने येत्या पाच वर्षांसाठी १०८ अब्ज अमेरिकी डॉलर उत्पन्नाची अपेक्षा ठेवली आहे. उच्च दर्जाच्या उत्पादनांची विक्री, इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या खपाचा वाढता प्रवाह, मोठ्या प्रमाणावर जगभरातून येणाऱ्या ऑर्डर आणि नुकतेच ताबा घेतलेल्या नव्या कंपन्यांचे केलेले यशस्वी एकत्रीकरण यामुळे व्यवस्थापनाने हे उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे.
मॅरीको : लक्ष्य - ८७५ रुपये
...........
मॅरीकोचे दीर्घकालीन वाढीचे लक्ष्य चांगले असून त्यांचा दर्जेदार ब्रँड, उत्तम दर्जाची उत्पादने, अन्नपदार्थ आणि महागड्या वैयक्तिक निगा-काळजीसंदर्भातील उत्पादने यांचा फायदा त्यांना होईल. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट सेतूसारख्या उपक्रमांमुळे वितरणाला होणारे सहाय्य तसेच खोबऱ्याच्या कमी होणाऱ्या किमती आणि ग्रामीण भागातील वाढती मागणी यामुळे त्यांची नफाक्षमता आणि खप वाढेल. या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा महसूल मागील वर्षीच्या तुलनेत २७ टक्के वाढला, तर देशांतर्गत विक्रीही ८% वाढली. ईबीआयटीडीए वार्षिक १२ टक्क्यांनी वाढला. या वर्षभरात खोबऱ्याच्या किमती चढ्या असूनही त्यांच्या व्यवसायाची चांगलीच वाढ झाली. मात्र नंतर कच्च्या मालाच्या किमती घसरल्यामुळे त्यांची नफाक्षमता वाढली. व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार एप्रिल २०२६ पासून नफाक्षमता १.५ ते २ टक्के वाढल्याने मध्यम कालावधीसाठी ईबीआयटीडीए देखील वाढेल. आमच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान महसूल आणि ईबीआयटीडीए अनुक्रमे दरवर्षी १६ व १५ टक्के चक्रवाढ दराने वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.