ठाणे-बोरिवली प्रकल्प पुन्हा वादात
- माती वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ
- डेडिकेटेड कॉरिडॉरचा रहिवाशांचा आग्रह
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मार्फत उभारण्यात येत असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामादरम्यान निघणाऱ्या मातीच्या विल्हेवाटीवरून स्थानिक रहिवासी आणि काही विकसक यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. माती वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषण वाढत असून श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे माती वाहतुकीसाठी कन्व्हेयर बेल्टचा पर्याय पुढे करण्यात आला असला तरी सुमारे ९० टक्के रहिवाशांनी स्वतंत्र डेडिकेटेड कॉरिडॉर (विशेष वाहतूक मार्गिका) उभारण्याची मागणी करीत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सुमारे १८ हजार ८३८ कोटी रुपयांचा ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग हा मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. ठाण्यातील मुल्ला बाग परिसरात सध्या खोदाईचे काम सुरू असून, दररोज अंदाजे ३५० डम्पर माती बाहेर काढली जाणार आहे. या वाढत्या डम्पर वाहतुकीमुळे परिसरातील वायू प्रदूषणात मोठी भर पडेल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सध्या हवा गुणवत्ता निर्देशांक २५०च्या आसपास जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच प्रदूषणाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रहिवाशांच्या मते, कन्व्हेयर बेल्टचा पर्याय काही विकसकांनी पुढे केला असला तरी त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी आणि संभाव्य पर्यावरणीय परिणामांचा सविस्तर अभ्यास झालेला नाही. व्हेराटॉन, निलकंठ ग्रीन्स आणि सत्य शंकर या प्रकल्पांशी संबंधित विकासक कन्व्हेयर बेल्टच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते. पण बहुतांश स्थानिक नागरिक डेडिकेटेड कॉरिडॉरच्या बाजूने ठाम आहेत. या मार्गिकेसाठी प्रकल्प क्षेत्रातील उपलब्ध जागेतूनच डम्पर वाहतूक होऊ शकते आणि त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टळेल, असा दावा रहिवाशांनी पत्रकार परिषदेत केला.
---------
नोटिसांना केराची टोपली
प्रथम भुयारी मार्गाचे टनेलिंगचे काम पूर्णत्वास न्यावे आणि त्यानंतर माती वाहतुकीचा पर्याय राबवावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे. महापालिकेकडून नोटिसा बजावूनही काही विकसकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करीत प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के लवकरच संबंधित पक्षांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत रहिवाशांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पत्रकार परिषदेस शिवसेना नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शिरोळकर, निवृत्त अभियंता भिडे, धाने, मुजुमदार आणि शरद वास्कर आदी उपस्थित होते.
-------------
रहिवासी हवालदिल
ठाणे-बोरिवली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्याआधीपासूनच येथील रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यांनी मांडलेल्या शंकांचे वेळोवेळी निरसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी भूमिका मांडली. रहिवाशाला त्रास होऊ नये म्हणून बोगद्याच्या मार्गामध्ये काही अंशी बदलही करण्यात आला होता. मात्र या कामादरम्यान होणारी मातीची वाहतूक आणि वाढणारे प्रदूषण हा मुद्दा जुनाच असून, त्यावर यशस्वी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे वाढत्या प्रकल्पकामांच्या पार्श्वभूमीवर विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे. रहिवाशांच्या भूमिकेमुळे हा प्रश्न पुढील काही दिवसांत अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.