सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित असलेले ‘महाराष्ट्र भवन’ हे भव्य आणि लखलखते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या प्रगतिपथावर आहे. या बहुउद्देशीय भवनाचे काम हे सिडको महामंडळामार्फत जलद गतीने सुरू आल्याचे नगरविकास विभागाने पत्राद्वारे आमदार मंदा म्हात्रे यांना कळविण्यात आले. लवकरच काही वर्षात महाराष्ट्र भवन उभे राहील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र भवनाच्या इमारतीमध्ये १५ मजले प्रस्तावित आहे. हा भूखंड किनारपट्टी नियमन क्षेत्रामध्ये येत नसल्याने त्या संदर्भातील वैधानिक परवानगीची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पर्यावरण विभागाचीदेखील मंजुरी प्राप्त झाली आहे. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्रदान केले आहे. कंत्राटदाराला कार्यादेशसुद्धा दिले असल्याचे पत्रात नमूद केले आहे. सद्यस्थितीत तीन मजल्यांचा बांधकामांसाठी उत्खननाचे काम सुरू असून शोअर पायलिंगचे काम हे प्रगतिपथावर सुरू आहे. त्यामुळे या भवनामध्ये अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त सभागृह, प्रदर्शन गॅलरी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त व्यासपीठ, अशा अनेक सोयी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र भवनाच्या प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेला पुतळा असणार आहे. त्यामुळे जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार आहे. महाराष्ट्र भवन हे आपल्या राज्याच्या संस्कृतीचा आणि प्रगतीचा प्रतीक ठरणार आहे. हे भवन वाशीत उभे राहणे म्हणजे नवी मुंबईच्या विकास यात्रेत एक ऐतिहासिक पाऊल आहे, असे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा वेग आणि गुणवत्तेवर भर देण्याच्या सूचना दिल्या.
सुविधांची रेलचेल
वाशी येथील या महाराष्ट्र भवनामध्ये अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रूम, तसेच लोकप्रतिनिधींसोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही विश्रांती रूम असणार आहेत. त्याचबरोबर ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सुसज्ज सुविधांची रेलचेल पाहावयास मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांना आसरा
राज्यनिहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणांहून नागरिक कामांसाठी, विविध स्पर्धा परीक्षा व नोकरभरतीसाठी मुंबईमध्ये येतात; मात्र हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल, तो आसरा शोधताना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनसाठी २०१४ पासून माझा जो लढा चालला होता, त्याला लवकरच पूर्णविराम लागणार असून या भवनचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे, तर पूर्ण राज्याला होणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे भवन महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाचा केंद्रबिंदू ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.