ऐरोली सेक्टर ३ मध्ये ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र
राजमाता जिजाऊ रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी व वाहतुकीला अडथळा
वाशी, ता. २८ (बातमीदार) : ऐरोली सेक्टर ३ येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाबाहेर ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले असतानाही वाहनचालकांकडून सर्रासपणे बेकायदा पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न तीव्र झाला आहे. रुग्णालयात दिघा, रबाळे, गोठिवली व ऐरोली परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असून, येथे प्रसूती विभाग तसेच आंतररुग्ण कक्ष सुरू असल्यामुळे दिवसभर गर्दी असते.
रुग्णालयाच्या आवारातच मार्केट आणि महापालिकेचे जी विभाग कार्यालय असल्याने नागरिकांची वर्दळ अधिक वाढते. अशा परिस्थितीत रस्त्यालगत उभी राहणारी वाहने, अनधिकृत रिक्षा स्टँड आणि शाळेच्या वेळेत होणारी अतिरिक्त वाहतूक यामुळे कोंडी नित्याची झाली आहे.
रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना वाहनांमधून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत असून, पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना आत-बाहेर करताना अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ‘नो पार्किंग’ फलक असूनही नियमांचे पालन होत नसल्याने हे फलक केवळ औपचारिकतेपुरतेच आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चौकट : विशेष कारवाईचे आश्वासन
रुग्णालयाबाहेर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असून, पाहणी करून विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी दिली.
महत्त्वाचा मुद्दा : आपत्कालीन सेवांना धोका
बेकायदा पार्किंगमुळे रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असल्याने तातडीने कडक अंमलबजावणी व नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.