‘एक गाव, एक होळी’ची प्रथा
विक्रमगड तालुक्यात पारंपरिक होळीला सुरुवात
विक्रमगड, ता. १ (बातमीदार)ः तालुक्यातील ग्रामीण भागात आजही पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्याची परंपरा जपली जात आहे. आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे खेड्यापाड्यांत एक गाव, एक होळी परंपरा आजही उत्साहाने पाळली जात आहे. त्यामुळे शहरी भागात गल्लीबोळात, सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होळ्या पेटवल्या जातात. मात्र, ग्रामीण भागात ‘एक गाव, एक होळी’ची प्रथा जपली जात आहे.
गावातील नवविवाहित जोडपी होळीभोवती पाच प्रदक्षिणा घालतात. काही ठिकाणी नवरा पत्नीला खांद्यावर घेऊन होळीमातेची प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आजही पाळली जाते. होळी पेटल्यानंतर भाजलेले नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. हा प्रसाद घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. लहान मुलांच्या हातातील डफ-डफलींचा आवाज शिमग्याच्या पारंपरिक स्वरांना उजाळा देतो. साखरेच्या पाकापासून तयार केलेले हार मुलांच्या गळ्यात झळकताना दिसतात. दरवर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेला ‘होळीची माळ’ म्हणतात. या माळावर पाच दिवस विविध खेळ, गरबा, मनोरंजनात्मक कार्यक्रम, तर काही पाड्यांवर तारपा नृत्य, ढोल नाच, लेझीम आणि सामूहिक नृत्यांचे कार्यक्रम रात्रभर रंगतात.
--------------------------
घरगुती पदार्थांचा नैवेद्य
- धुळवडीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळ्यांचा सुगंध दरवळतो. रंगपंचमीला झाडे-फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरण्याची परंपरा अजूनही कायम आहे. होळीच्या पूजेसाठी भेंडीचे झाड किंवा बांबूची फांदी ‘होळी माता’ म्हणून आणली जाते.
- तांदूळ, नागली, कुरडई, पापड्या, पुरणपोळी आदी घरगुती पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी पारंपरिक रितीनुसार बांबूच्या टोकाला जिवंत कोंबडीचे पिल्लू बांधण्याची प्रथा अद्याप सुरू आहे.
--------------------------------
पोस्त मागण्यासाठी सोंग
बाजारात साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या रेडिमेड गाठी (हार), विविध डिझाइनमधील पिचकाऱ्या, रंग, मुखवटे, इतर सणसामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. पोस्त मागण्यासाठी काही तरुण वेगवेगळे वेष परिधान करून, चेहऱ्यावर रंग लावून, हातात डफरे वाजवत फिरताना दिसत आहेत. कुणी जोकरचा मुखवटा लावलेला, तर कुणी स्त्रीवेषात असे रंगीबेरंगी दृश्य धुळवडीचे वैशिष्ट ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.