होळीची चाहूल देणारा ‘डफड्यांचा’ नाद हरवला
ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज
टोकावडे, ता. १ (बातमीदार) : होळीचा सण जवळ आला की ग्रामीण भागातील गावागावांत आणि बाजारपेठांत डफड्यांचा घुमणारा आवाज म्हणजे उत्सवाच्या आगमनाची जणू नांदीच असायची; मात्र बदलत्या काळानुसार पारंपरिक डफड्यांचा हा घनगंभीर नाद आता हळूहळू लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे.
पूर्वी लोखंडी रिंगवर चामडे ताणून तयार केलेली अस्सल डफडी बाजारात मिळायची. वाजवून आवाज कमी झाला की, चुलीच्या विस्तवावर ती थोडी गरम केली जायची. उष्णता मिळताच पुन्हा त्यातून निघणारा झणत्कार सणोत्सवाचा माहोल उभा करायचा. गळ्यात साखरेच्या गाठी, हातात डफडी आणि ओठांवर होळीची गाणी असा लहान मुलांचा जल्लोष गावांच्या वेशीवर पाहायला मिळायचा.
आज बाजारात रंगीबेरंगी आणि स्वस्त प्लॅस्टिकची डफडी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ती दिसायला आकर्षक असली तरी, पारंपरिक डफड्यांमधला तो जिवंतपणा आणि ''आत्मा'' त्यात जाणवत नाही. दुसरीकडे, मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढी मैदानी खेळ आणि पारंपरिक वाद्यांपासून दुरावत चालली आहे.
नफ्यापेक्षा समाधान मोठे
बदलत्या काळातही मुरबाडचे हरिचंद्र जाधव (हरीमामा) संस्कृतीची ही ज्योत तेवत ठेवत आहेत. दरवर्षी मुरबाड पोस्ट ऑफिससमोर ते आपले छोटेसे दुकान थाटतात. स्वतः डफडा वाजवून ते ग्राहकांचे लक्ष वेधतात आणि शहराला "होळी आली" याची जाणीव करून देतात. हरीमामा वर्षभर चप्पल-बूट शिवण्याचे काम करतात, तर पावसाळ्यात छत्र्या दुरुस्त करतात. डफडी विकून फारशी कमाई होत नसली तरी, केवळ परंपरा टिकवण्यासाठी ते ही मेहनत घेतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि कामाप्रती असलेली निष्ठा मुरबाडकरांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे.
तरुणाईची उदासीनता ही चिंतेची बाब
मुरबाडकरांसाठी हरीमामांचा डफड्यांचा नाद केवळ व्यवसाय नाही, तर जुन्या आठवणींना उजाळा देणारा दुवा आहे. मात्र, नवीन पिढी ही कला आणि परंपरा विसरत चालल्याने, भविष्यात डफड्यांचा हा गजर कायमचा शांत होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.