वंदना एसटी आगारात पाण्याची चढ्या दराने विक्री
वजन-मापे विभागाचा दुकानदाराला दणका
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) : ठाण्यातील वंदना एसटी आगारात प्रवाशांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन छापील किमतीपेक्षा पाच रुपये जास्त दराने पाण्याची विक्री करणाऱ्या दुकानदारावर वजन-मापे विभागाने धडक कारवाई केली आहे. डमी ग्राहकाच्या माध्यमातून या काळाबाजाराचा पर्दाफाश करण्यात आला असून, दुकानदाराला रंगेहाथ पकडण्यात आले.
वंदना आगारातून पुणे आणि राज्याच्या इतर भागांत मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने प्रवाशांकडून बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. आगारात प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसल्याचा फायदा घेत येथील ‘नाथ जल’ या पाणी विक्री केंद्रावर १५ रुपयांची पाण्याची बाटली २० रुपयांना विकली जात होती. या लूटमारीबाबत वजन-मापे विभागाकडे प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारीला एका डमी ग्राहकाला या दुकानात पाठवले.
रंगेहाथ पकडले
डमी ग्राहकाने पाण्याच्या चार बाटल्या मागितल्या असता, दुकानदाराने प्रति बाटली २० रुपये याप्रमाणे ८० रुपये आकारले. व्यवहार पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी दुकानदाराला रंगेहाथ पकडले आणि वजन-मापे कायद्याअंतर्गत त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.
प्रशासकीय त्रुटीवर बोट
आगारात प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची हक्काची सोय नसल्याने प्रवाशांना खासगी दुकानांवर अवलंबून राहावे लागते. याच संधीचा गैरफायदा दुकानदार घेत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. ग्राहकांनी कोणत्याही वस्तूसाठी छापील किमतीपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत आणि असे प्रकार घडल्यास तातडीने प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन वजन-मापे विभागातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.