भाड्याच्या जागेत तत्काळ रुग्णालय सुरू करा
दिव्यासाठी ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांची पालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : दिवा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने या परिसरात तत्काळ भाड्याच्या जागेत अद्ययावत रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी केली आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे.
ज्योती पाटील म्हणाल्या की, दिवा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत आरोग्य सुविधा शून्य आहेत. साध्या उपचारांसाठीही दिवावासीयांना ठाणे किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दिव्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, येथे तातडीने अद्ययावत रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. ठाणे पालिका प्रशासन प्रभाग समितीच्या कामकाजासाठी खाजगी मालकीची जागा भाड्याने घेऊन कार्यालय सुरू करू शकते, तर मग सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी भाड्याच्या जागेत रुग्णालय का सुरू केले जात नाही? शासकीय इमारतीची प्रतीक्षा करण्यापेक्षा, तातडीची गरज ओळखून महापालिकेने पर्यायी जागेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या, असेही त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर ज्योती पाटील यांनी महापालिका आयुक्तांनी स्वतः या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
आश्वासने पूर्ण करा
दिव्यात सर्व सोयींनीयुक्त असे स्वतंत्र रुग्णालय तातडीने कार्यान्वित व्हावे. महापालिका आयुक्तांनी केवळ कागदोपत्री आराखडे न बनवता प्रत्यक्ष जमिनीवर काम करावे. निवडणुकीत मोठे यश मिळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता दिव्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.