स्थायी समितीसाठी चुरस
भाजप, कॉँग्रेसकडून अर्ज दाखल
भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपकडून हसमुख गेहलोत, कॉँग्रेसकडून अनिल सावंत निवडणूक लढत आहेत. मात्र संख्याबळ जास्त असल्याने सभापतिपदी गेहलोत यांची निवड होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती या पदांसाठी केवळ भाजपकडूनच उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी भाजपकडे १३ तर कॉँग्रेस आणि शिवसेना यांच्या शहर विकास आघाडीकडे तीन सदस्य आहेत. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी भाजपकडून तर अनिल सावंत यांनी कॉँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून अनुभवी नगरसेवक प्रकाश ऊर्फ मुन्ना सिंह इच्छुक होते. मात्र गेहलोत आमदार नरेंद्र मेहता यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने त्यांना सभापतिपदासाठी संधी देण्यात आली आहे.
------------------------
महिला व बालकल्याणसाठी बिनविरोध
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती या पदांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. समितीच्या नऊ सदस्यांपैकी भाजपकडे सात, विरोधी पक्षाकडे दोनच सदस्य आहेत. सभापती, उपसभापती या पदांसाठी दाखल उमेदवारी अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या स्वाक्षरी आवश्यक असतात. परंतु विरोधी पक्षांकडे दोनच सदस्य असल्याने उमेदवाराला अनुमोदन देण्यासाठी सदस्यच नाही. परिणामी ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
------------------------
फोटो ः मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपचे हसमुख गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.