हरित पर्यटनाला मिळणार चालना
टिटवाळ्यात निसर्गायण प्रकल्पाचा संकल्प
टिटवाळा, ता. ३ (वार्ताहर)
आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळ्याच्या शिरपेचात आता पर्यावरणाचा नवा तुरा खोवला जात आहे. टिटवाळा महागणपती मंदिर ट्रस्टच्या जागेत ‘निसर्गायण’ पर्यावरण शिक्षण व पर्यटन प्रकल्प दिमाखात आकाराला येत आहे. श्रद्धा आणि निसर्ग संवर्धन यांची सांगड घालणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम टिटवाळ्याला हरित पर्यटनाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे.
विश्वस्त सुभाष जोशी यांच्या दूरदृष्टीतून आणि महागणपती मंदिर ट्रस्टच्या सक्रिय पाठबळामुळे या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोव्हीजल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जात आहे. याकामी महेश एगडे, राजेश एगडे आणि एगडे कुटुंबीयांनी जागेसंदर्भात मोलाचे सहकार्य करून समाजभावनेचे दर्शन घडविले आहे.
हा प्रकल्प केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून, एक व्यापक पर्यावरण केंद्र म्हणून विकसित केला जात आहे. येथे जैवविविधता संवर्धन केले जाणार आहे. स्थानिक वनस्पती आणि जीवांचे संरक्षण केले जाईल. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारे शिक्षण केंद्र शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, विशेष प्रशिक्षण आणि निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून पर्यावरण साक्षरतेचे धडे देणार आहे. जलसंतुलन आणि शाश्वत ऊर्जास्रोतांचा प्रभावी प्रसार करण्यासाठी येथे आधुनिक हरित तंत्रज्ञानाचा वापर व प्रदर्शन केले जाईल. भाविकांसाठी हे केंद्र केवळ आध्यात्मिक दर्शनाचे ठिकाण न राहता, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची आणि पर्यावरण पर्यटनाचा आनंद घेण्याची एक सुवर्णसंधी ठरेल. या सोहळ्याला सामाजिक चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्वे उपस्थित होती. यात प्रामुख्याने विद्याधर वालावलकर, कविता वालावलकर, संजय जोशी, संगीता जोशी, हरेंद्र सोष्टे, श्रीधर दादा खिस्मतराव, अॅड. जितेंद्र जोशी, बजरंग अग्रवाल, अश्फाक मांडेकर आणि योगेश जोशी यांचा समावेश होता.
सामाजिक पाठबळ
प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर ॲड. हर्षली चौधरी, नगरसेवक संतोष तरे, बंदेश जाधव आणि अमित धाक्रस यांनी उपस्थित राहून प्रकल्पाला प्रशासकीय बळ दिले. पर्यावरणात केलेली आजची गुंतवणूक उद्याचा समृद्ध वारसा ठरेल. या प्रकल्पाद्वारे टिटवाळा जागतिक नकाशावर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.