कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी भविष्यातील उपयोजनात नियमन आवश्यक
कृत्रिम बुद्धिमत्ता नियमन मंडळाचे सदस्य डॉ. सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. ४ ः “कृत्रिम बुद्धिमत्ता ही जणू एक अज्ञात प्राणी आहे. हा प्राणी भविष्यात कोणता आकार धारण करेल, याविषयी आपण आजच्या घडीला काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या उपयोजनांचे नियमन करण्याची निकड आहे,” असे उद्गार कृत्रिम बुद्धिमत्ता नियमन मंडळाचे सदस्य माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी काढले.
वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाने नुकतेच आयोजित केलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील भेदाभेद आणि त्याचा समाज व व्यापारवर होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. सुरेश प्रभू यांनी आपल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे अंमलबजावणी करत असतानाच त्यातील उत्तरादायित्वाचेही संतुलन साधले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, “समाजात आधीपासून असलेल्या भेदांचेच प्रतिबिंब कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही पडलेले दिसून येते. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामी जगातले विविध समाज आणि त्यांच्या अर्थव्यवस्था अभूतपूर्व वेगाने बदलत असताना, या तंत्रज्ञानाच्या प्रसाराला सशक्त, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर समन्वित अशा नियामक यंत्रणेद्वारे योग्य दिशा दाखवली पाहिजे. अशी नियामक यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रसारात अडथळा न ठरता तिने हे तंत्रज्ञान जबाबदारीने विकसित होण्यास सहाय्य करावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि प्रशासन यासारख्या क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे,” असे ते म्हणाले.
चेतना शिक्षण संस्थेचे वाणिज्य व कला महाविद्यालय, तसेच रामप्रसाद खंडेलवार व्यवस्थापन महाविद्यालय यांनी संयुक्तपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामाजिक परिणामांविषयीची ही परिषद आयोजित केली होती. परिषदेचे बीजभाषण माहिती-तंत्रज्ञानशास्त्रातील तज्ज्ञ व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एमकेसीएल) मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांनी केले. दरम्यान, परिषदेच्या समारोपप्रसंगी होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनिश कामत आणि आयएमएस लर्निंग रिसोर्सेसचे व्यवस्थापकीय संचालक कमलेश सजनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी बोलताना डॉ. कामत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे मूल्ययुक्तता कशी टिकून राहील ते उदाहरणांसह स्पष्ट केले.
परिणामांवर चर्चा
दोन दिवसांच्या या शैक्षणिक परिषदेत देशविदेशातील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि अभ्यासक, विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. आरोग्यसेवा, शिक्षण, वित्त, प्रशासन आणि रोजगार यासह विविध क्षेत्रांमध्ये एआय बायस आणि त्याचे दूरगामी परिणाम यावर विस्तृत चर्चा झाली. या सहभागी अभ्यासकांनी सामाजिक असमानतेच्या परिणामी अल्गोरिदमिक भेद कसे पक्के होतात, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर कसा प्रभाव टाकू शकतात, तसेच त्याचा नैतिक मानकांवर कसा परिणाम होतो याचे विश्लेषण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.