मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ‘बर्निंग ट्रक’
चालकाचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी
कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मध्यरात्री अपघात होऊन ट्रकला आग लागली. या दुर्घटनेत चालकाचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
डहाणू तालुक्यातील सोमटा-मेंढवण परिसरात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर ट्रकने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांत आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तसेच अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि कासा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले; मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला होता.
-----
वाहनांना आग लागण्याच्या घटनांत वाढ
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट देत मदतकार्याचे समन्वयन केले. मृत चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पुढील तपास कासा पोलिस करत आहेत. दरम्यान, या महामार्गावर वारंवार वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी स्थानिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.