मुंबई जलवाहतुकीसाठी ६,६०० कोटींची तरतूद
- मत्स्यव्यवसाय व बंदरे क्षेत्राला अर्थसंकल्पातून चालना
- मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी १,२४० कोटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्याच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबई जलवाहतुकीसाठी ६,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे क्षेत्रासाठीही महत्त्वपूर्ण निधीची घोषणा करण्यात आली आहे. या तरतुदींमुळे किनारपट्टीवरील पायाभूत सुविधा आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी दरवर्षी १,२४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना मिळून मच्छीमार बांधवांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील जलवाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी ६,६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील रेडिओ क्लब परिसरात नवीन जेट्टी उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे सागरी वाहतूक, तसेच पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वाढवण बंदराला गती
दरम्यान, देशातील महत्त्वाच्या बंदर प्रकल्पांपैकी एक असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी राज्याच्या हिस्स्याचा निधी टप्प्याटप्प्याने मंजूर करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून १२ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता असून, परिसरातील ४४ गावांतील स्थानिक तरुणांसाठी ‘वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे.
सातपाटीला आधुनिक बंदर
याशिवाय पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे आधुनिक मत्स्य बंदर उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण २०२५’ अंतर्गत मरीन शिपयार्ड क्लस्टर तसेच ग्रीनफिल्ड जहाज बांधणी क्लस्टर उभारण्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे सागरी उद्योगांना बळकटी मिळून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
मुंबईत जलवाहतुकीचे जाळे
मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गांचे १२५ किलोमीटरचे जाळे ३४० किलोमीटरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या वार्षिक एक कोटी ६० लाख असलेली प्रवासी संख्या २०३१पर्यंत सात कोटी ३९ लाखांपर्यंत वाढेल. यासाठी २१ विद्यमान जलमार्गांवरील २० टर्मिनलचे अद्ययावतीकरण आणि ११ नवीन जलमार्गांवर २४ टर्मिनलच्या निर्मितीसाठी सहा हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.