राज्यात अनुवाद अकादमीची स्थापना
‘सकाळ’च्या वृत्तावर अर्थसंकल्पी भाषणात शिक्कामोर्तब
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ इतर भाषांमध्ये आणि इतर भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठी भाषेत अनुवाद करण्यासाठी राज्यात ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ची स्थापन केली जाणार आहे. त्याबाबतची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पी भाषणात केली.
‘सकाळ’ने १३ नोव्हेंबरला ‘राज्यात लवकरच अनुवाद अकादमी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. राज्यात पहिली अनुवाद अकादमी ही ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ या नावाने स्थापन करण्याचे प्रस्तावित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषा विभागाकडून विविध प्रकल्प आणि उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विभागाकडून जगभरातील अभिजात साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करणे, तसेच मराठीतील साहित्य जगातील इतर भाषांमध्ये उपलब्ध करून ते अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमी स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. या अकादमीच्या माध्यमातून समृद्ध प्राचीन साहित्यासह प्राकृत, अपभ्रंश, पाली आदी प्राचीन साहित्याचे तसेच मोडी साहित्याचे मराठीत लिप्यांतर करण्यासाठी ही नव्याने स्थापन केली जाणारी अकादमी महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाकडून देण्यात आली होती. आता या अकादमीच्या स्थापनेवर अर्थसंकल्पातच शिक्कामोर्तब झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.