न्यायमूर्तींच्या आरोग्यावरही परिणाम
कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : न्यायमूर्तींच्या आरोग्यावरही न्यायालयीन कामकाजाचा परिणाम होत असतो. ताण येतो. त्यामुळे युक्तिवाद करताना वकिलांनी व्यवस्थेचा आदर करण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ६) लीलावती रुग्णालय ट्रस्टशी संबंधित प्रकरणावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केले.
संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी लीलावती रुग्णालयातील वादासंदर्भात दिलेल्या आदेशाला विश्वस्त प्रशांत आणि चारू मेहता यांनी आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी वादाशी संबंधित काही घटनांमुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांवरील आरोपांची माहिती न्यायालयाला देण्यात आली. तेव्हा, या न्यायालयातही अशा घटना घडत असल्याचे न्या. घुगे यांनी नमूद केले. अनेकदा आम्ही वकिलांना फटकारतो. याचा अर्थ आम्ही त्यांच्याविरोधात आहोत का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. पुढे तोच वकील आमच्याच न्यायालयातून अपेक्षित असलेला अंतरिम आदेश घेऊन बाहेर पडतो, यावरही न्यायालयाने भर दिला.
न्यायमूर्ती आणि न्यायिक अधिकारी न्यायालयातील कामाचा ताण, संताप, राग घरी घेऊन जात नाहीत. किंबहुना न्यायालयाचे काम अविरत सुरू ठेवायचे असेल, तर आम्हाला असे करणे परवडणारे नाही. कामकाजाचा ताण घरी घेऊन गेलो असतो, तर आपण रुग्णालयात असतो, लीलवतीमध्ये नाही, अशी टिप्पणीही न्या. घुगे यांनी केली. आमच्यावर कामाचा खूप ताण आहे, असेही नमूद करताना न्या. घुगे यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. मनिंद्र श्रीवास्तव यांनी अशाच प्रकारच्या ताणाबद्दल केलेल्या अलीकडच्या टिप्पण्यांचा संदर्भ दिला. या सगळ्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सुदैवाने आपण कामाचा ताण घेत नाही अन्यथा काय झाले असते याची तुम्ही कल्पना करू शकता का? अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
आर्थिक अनियमितता आणि रुग्णालयाचे नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांच्या आरोपांमुळे माजी स्थायी विश्वस्त राजेश मेहता यांना निलंबित केल्यानंतर लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टमध्ये सध्या वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.