सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम घेण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत आंबिवली येथील अटाळी-कोळीवाडा परिसरातील लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्रात कौशल्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून महिलांसाठी ‘रणरागिणी’ मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे.
आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील अटाळी गावातील विराट रेसिडेन्सीजवळील लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्रात रविवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महिलांना योग्य संधी व कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास त्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थवील, उपमहापौर राहुल दामले आणि आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच विविध राजकीय पक्षांचे गटनेते, लोकप्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व योगेश गोडसे, सचिव किशोर शेळके यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित राहणार आहेत.
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि लाईट हाऊस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कमी उत्पन्न गटातील युवक-युवतींना शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, टॅली, ग्राफिक डिझाइन आदी विविध प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आतापर्यंत दोन हजार १४७ युवक-युवतींनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यापैकी ८५०हून अधिक जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यात ६६ टक्के म्हणजेच ५६१ महिला लाभार्थी आहेत. कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
‘रणरागिणी’साठी मॅरेथॉन
कल्याण-डोंबिवली महापालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘रणरागिणी’ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा तीन गटांत असून सकाळी ६ वाजता १० किमी, सकाळी ७ वाजता ५ किमी आणि सकाळी ७.४५ वाजता ३ किमी अशी स्पर्धा पार पडेल. स्पर्धेत ‘बेस्ट कॉस्च्युम’, ‘बेस्ट थीम’ आणि ‘बेस्ट ग्रुप थीम’ अशी विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा मार्ग कल्याण पश्चिमेतील गांधारे ब्रीज मार्गे रिंग रोड असा राहणार आहे. या स्पर्धेसाठी विद्युत व यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.