माणगावला काजूच्या बियांना मोठी मागणी
आदिवासी भगिनींच्या कष्टांना मिळतेय सोन्याची किनार
माणगाव, ता. ८ (वार्ताहर) : डोंगररांगा, घनदाट जंगल आणि उन्हाने तापलेली माती या कठीण परिस्थितीतही जगण्यासाठी झगडणाऱ्या माणगाव तालुक्यातील आदिवासी भगिनींच्या हातात आज रानमेव्याचे धन सापडले आहे. सध्या माणगावच्या बाजारपेठेत काजूच्या ताज्या बियांना मोठी मागणी असून, त्यांच्या मेहनतीला बाजारपेठेची चांगली साथ मिळताना दिसत आहे.
माणगाव तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी महिला रणरणत्या उन्हात जंगलवाटा तुडवत काजूच्या बिया, करवंदे, जांभळे, कैऱ्या आणि विविध रानभाज्या गोळा करतात. हा रानमेवा त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार बनला आहे. सध्या बाजारात १०० काजूच्या बियांना २०० ते ३०० रुपये असा दर मिळत असून, आकारमानानुसार किंमत बदलते. जूनपर्यंत हा छोटासा व्यवसाय बहरात असतो.
मुंबई, ठाणे, पुणे तसेच कोकणातील पर्यटक आणि प्रवासी माणगाव येथे थांबून आवर्जून हा रानमेवा खरेदी करताना दिसतात. महामार्गाच्या कडेला उन्हात बसून विक्री करणाऱ्या या महिलांच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी त्यांच्या डोळ्यांत आशेची चमक दिसते.
काजूच्या बिया गोळा करताना त्यांना घनदाट जंगलात जावे लागते. वाघ, बिबट्या, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा धोका कायम असतो. शिवाय काजूच्या बियांचे कवच काढताना हातांची कातडी सोलली जाते आणि बोटांना जखमा होतात. तरीही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या न डगमगता मेहनत करीत राहतात.
या हंगामात काजूच्या बियांबरोबरच करवंदे, जांभळे, आंबे, कैऱ्या आणि विविध रानभाज्यांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. रासायनिक प्रक्रियेपासून दूर असलेला हा नैसर्गिक व पौष्टिक रानमेवा शहरातील ग्राहकांना विशेष आकर्षित करीत आहे.
चौकट
हक्काची बाजारपेठ मिळाल्यास बदलू शकते चित्र
या मेहनती आदिवासी भगिनींना कायमस्वरूपी व सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने त्यांच्यासाठी संरक्षित विक्री केंद्रे, सावलीची व्यवस्था आणि योग्य हमीभाव निश्चित केल्यास त्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडू शकतो. नियोजनबद्ध विक्री व्यवस्थेमुळे या रानमेव्याला योग्य मूल्य मिळेल आणि आदिवासी समाज आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.