बेलापूर टेकड्यांवरील वनाग्नी प्रकरणी चौकशीची मागणी
जमीन बळकावण्याच्या हेतूचा संशय; पर्यावरण कार्यकर्ते आणि रहिवाशांची चिंता
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : बेलापूर परिसरातील टेकड्यांवर बुधवारी रात्री भीषण वनाग्नी भडकला. आकाशाला भिडणाऱ्या ज्वाळांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कल्पतरू आणि विकासिनी सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मागील बाजूस ही आग स्पष्टपणे दिसत असल्याने रहिवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली.
स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, बेलापूर टेकड्यांवर वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून, यामागे हेतुपुरस्सर हरितावरण नष्ट करून जमीन बळकावण्याचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निसर्गरम्य टेकड्यांवर आग लागण्याची ही पहिली घटना नाही. याबाबत आम्ही अनेकदा वन विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र त्यावर ठोस कारवाई झालेली नाही, असे पर्यावरण कार्यकर्ते कपिल कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वारंवार लागणाऱ्या आगींचा संबंध बेकायदा जमीन वापराशी असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांत बेलापूर टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सुमारे २.३ लाख चौरस फूट क्षेत्रात कथित बेकायदा धार्मिक बांधकामे उभारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही बांधकामांनी मूळ क्षेत्रफळाच्या दुप्पट जागा व्यापल्याचा दावा सेव्ह बेलापूर हिल्स फोरमचे सदस्य कृष्णन पोट्टी यांनी केला.
चौकट
सिडकोकडून कारवाईची अपेक्षा
टेकड्यांवरील हरितावरण नष्ट झाल्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याचा मुद्दा महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातही उपस्थित करण्यात आला होता. वन विभागाने या टेकड्या सिडकोकडे हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट केल्याने अतिक्रमण रोखणे आणि आगींची सखोल चौकशी करणे ही जबाबदारी आता सिडकोची असल्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. या घटनेमुळे पर्यावरणीय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.