विकासकामांचा त्रास प्रवाशांना
कांदिवली स्थानक परिसरात धूळ, राडारोड्यामुळे अपघाताची भीती
कांदिवली, ता. १० (अनिल चासकर) : कांदिवली रेल्वे स्थानकाच्या विस्तार, नूतनीकरण आणि इतर विकासकामांमुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ व राडारोडा साचला असून, यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी टाकण्यात आलेले राडारोड्याचे ढिगारे, लाद्या आणि इतर बांधकाम साहित्य मार्गांवर पडून असल्याने प्रवाशांना चालताना अडचणी येत आहेत.
यासंदर्भात स्थानक व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
प्रचंड लोकवस्ती असलेल्या कांदिवली परिसरातून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. तसेच महिंद्रा कंपनीसह विविध लघुउद्योगांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी या स्थानकाचा वापर करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून स्थानकाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. यात प्रशस्त डेक, जिने, प्रवासी मार्ग, फलाट तसेच सरकते जिने उभारण्याचे काम सुरू आहे.
या सुरू असलेल्या कामांमुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि धूळ निर्माण झाली आहे. फलाट क्रमांक १ वर बसविण्यात आलेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याजवळ खाऊचा स्टॉल असल्याने तेथे जागेची कमतरता जाणवते. तिकीटघराजवळ पत्रे, बांधकाम साहित्य आणि राडारोडा पडून असल्याने प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच दुरुस्ती झालेल्या फलाटाचा पृष्ठभागही खडबडीतच ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
फलाटावर बसण्यासाठी असलेल्या बाकांच्या आजूबाजूला लाद्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच फलाटावर ये-जा करण्याच्या मार्गांवर जागोजागी राडारोडा, जुनाट पत्रे आणि खड्डे असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. याशिवाय फलाटावर खाण्याचे स्टॉलही प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांना हालचालीसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याची तक्रार आहे.
प्रवाशांच्या सुविधांसाठी कामे सुरू असली तरी राडारोड्याचे ढिगारे आणि प्रचंड धूळ यामुळे नियोजनशून्य कारभार दिसून येतो. रेल्वे प्रशासनाने लाखो प्रवाशांचा विचार करून मार्ग सुलभ आणि धूळमुक्त करावा.
- सूचित वैती, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.