श्रमजीवी संघटनेतर्फे प्रशासकीय सेवेतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
विरार, ता. १० (बातमीदार) : श्रमजीवी संघटनेतर्फे उसगाव डोंगरी येथे दोनदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातून ४००हून अधिक महिला उपस्थित होत्या. मेळाव्यात विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच आरोग्य, शिक्षण आणि बालविकास या विषयांवर चर्चा करून हक्कांसाठी पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून तसेच संघटनेची गीते आणि घोषणांनी करण्यात आली. सकाळच्या सत्रात पालघर प्रशासकीय अधिकारी क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रीतल राऊत आणि वाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी बाणे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी महिलांनी डिजिटल मीडियाचा वापर करताना सतर्कता कशी बाळगावी, याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक पल्लवी बाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की श्रमजीवी संघटना ही एक कुटुंब आहे. बालविक्रीसारख्या गंभीर घटना असोत किंवा ग्रामीण भागातील इतर समस्या, त्याबाबत पोलिसांपर्यंत सर्वप्रथम माहिती पोहोचवणारी संघटना म्हणजे श्रमजीवी आहे.
या कार्यक्रमात संघटनेत नेतृत्व करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ प्रतिनिधी महिला म्हणून संघटनेच्या सुरुवातीपासून आजपर्यंत सातत्याने कार्यरत असलेल्या विमल परेड यांचा संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये वेणूताई मेघवाले, प्रमिला पारधी, ताईबाई गायकर, आशा वाघात, तिलू वायडा आणि सीता घाटाळ यांचाही समावेश होता. तसेच तरुण महिला नेतृत्व म्हणून विशेष कार्य करणाऱ्या पालघर तालुक्याच्या महिला प्रमुख आकांक्षा कुंभारे यांचाही सत्कार करण्यात आला.
दुपारच्या सत्रात आरोग्य, शिक्षण आणि बालविकास या विषयांवर महिलांशी संवाद साधण्यात आला. दर महिन्याच्या २३ तारखेला गावातील अंगणवाडी, शाळा आणि ग्रामीण रुग्णालयांची स्वच्छता मोहीम राबविणे तसेच गरीब महिलांना शिधापत्रिकेवर मोफत सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी लढा उभारण्याचा पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. या चर्चेत संघटनेच्या संघटक सचिव (प्रशिक्षण) सीता घाटाळ, प्रवक्त्या चंद्रा जाधव आणि तलासरी तालुका अध्यक्षा सुरक्षा जाबर यांनी नेतृत्व केले.
यानंतर डहाणू येथील गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी पल्लवी सस्ते, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उपस्थित महिलांना संघटनात्मक काम, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.