पाकिस्तान कैदेतील मच्छीमारांच्या कुटुंबीयांना मदतीचा तिसरा हप्ता
पालघर, ता. ११ : पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या पालघर जिल्ह्यातील मच्छीमार खलाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागामार्फत १८ कुटुंबांना एकूण आठ लाख ८० हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, आतापर्यंत या कुटुंबांना एकूण ७२ लाख १६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या या बोटी अनेकदा पाकिस्तान सीमेजवळील मत्स्यसंपन्न भागात जातात. काही वेळा चुकून भारतीय समुद्री हद्द ओलांडली गेल्यास पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा त्या मच्छीमारांना ताब्यात घेऊन तुरुंगात टाकतात. सध्या पालघर जिल्ह्यातील १८ मच्छीमार तसेच काही महिन्यांपूर्वी पकडलेला आणखी एक खलाशी पाकिस्तानात कैदेत आहेत. घरातील कमावता सदस्य तुरुंगात असल्याने या कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने जून २०२३ मध्ये अशा कुटुंबांना दररोज ३०० रुपयांच्या मर्यादेत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. जून २०२५ मध्ये १६.१९ लाख रुपयांचा पहिला हप्ता आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये ४७.१६ लाख रुपयांचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला. ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या कालावधीसाठी मागविलेल्या निधीतून मिळालेली आठ लाख ८० हजार रुपयांची रक्कम आता संबंधित कुटुंबांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त दिनेश पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.