मालमत्ता कराच्या दंडावर ९० टक्के सूट
महापौरांकडून ‘अभय योजना’ जाहीर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे महापालिका क्षेत्रातील निवासी मालमत्ता करदात्यांसाठी महापालिकेने मोठी सवलत जाहीर केली आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये (दंड व व्याज) तब्बल ९० टक्के सूट देणारी विशेष योजना लागू करण्यात आली असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपला कर भरण्याचे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बुधवारी (ता. १२) केले.
महापौर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या वेळी गटनेते पवन कदम आणि उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते. अनेक करदात्यांनी थकीत करावरील दंडात सवलत मिळावी, अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाला चालू आर्थिक वर्षामध्ये ८४० कोटीहून अधिक मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६६० कोटी मालमत्ता कर जमा झाला असून, शंभर कोटींच्या दंडात्मक व्याजासह सुमारे ३०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल होणे शिल्लक आहे. त्यासाठी केवळ २१ दिवसांची मुदत शिल्लक राहिली आहे. मालमत्ता कर आणि दंड थकवणाऱ्यांमध्ये मोठा वर्ग हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे सांगत त्यांना दिलासा मिळावा आणि महापालिकेच्या तिजोरीत भर पडावी यासाठी ही अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेना गटनेते पवन कदम यांनी दिली. जास्तीत जास्त नागरिकांनी या १५ दिवसांच्या मुदतीत आपला कर भरून दंडातील सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.
योजनेचे स्वरूप आणि मुदत
ही योजना अत्यंत मर्यादित कालावधीसाठी असून, १२ मार्च ते २५ मार्च या १५ दिवसांच्या काळात जे करदाते आपला थकीत कर आणि चालू वर्षाचा कर अधिक दंडाची केवळ १० टक्के रक्कम एकत्रितपणे जमा करतील, त्यांनाच ही ९० टक्के सवलत मिळणार आहे. ज्या नागरिकांनी या निर्णयापूर्वीच आपला निवासी मालमत्ता कर भरला असेल, त्यांनाही या योजनेचा लाभ नियमानुसार दिला जाईल.
कर भरण्यासाठी विविध सुविधा
१ नागरिकांना कर भरता यावा यासाठी महापालिकेने प्रभाग समिती स्तरावरील सर्व संकलन केंद्रे सुरू ठेवली आहेत. कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत, तर शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत ही केंद्रे कार्यरत राहतील.
२ याशिवाय, महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने तसेच विविध भ्रमणध्वनी देयक प्रणालींद्वारे घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. करदात्यांना आपले देयक पाहण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी महापालिकेने व्हॉट्सॲप संवाद प्रणालीदेखील कार्यान्वित केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.