पिवळ्या शेतीमुळे बळीराजाला धनलाभ
डहाणू परिसरात झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड
कासा, ता. १२ (बातमीदार) ः सण-समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच मंदिरांमध्ये झेंडूंच्या मागणीमुळे डहाणू परिसरात भातशेतीबरोबरच अनेकांनी झेंडूची लागवड केली आहे. कासा, पेठ, साखरे, सारणी, सायवन, नानिवली, वाणगाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात झेंडूची शेती केली जात असून, कडक उन्हातही ‘पिवळी शेती’तून बळीराजाला धनलाभ होत आहे.
झेंडू पिकाचे उत्पादन अवघ्या अडीच ते तीन महिन्यांत मिळत असल्याने वर्षभरात अनेक वेळा उत्पादन घेता येते. यासाठी योग्य बाजारपेठ, सण-समारंभांचा कालावधी लक्षात घेऊन लागवडीचे नियोजन केले जाते. झेंडू पिकासाठी उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. या पिकाला तुलनेने कमी पाणी लागत असल्यामुळे तिन्ही ऋतूंमध्ये झेंडूची लागवड शक्य होत आहे. उन्हाळी हंगामात झेंडूची लागवड विशेष फायदेशीर ठरत असून, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी या शेतीकडे आकर्षित होत आहेत. परिसरातील काही शेतकऱ्यांनी पाच ते सहा एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली आहे. मुंबईतील दादर बाजारपेठेसह ठाणे परिसरात ही फुले पाठवली जातात.
---------------------------
आफ्रिकन प्रजातीची लागवड
झेंडूच्या आफ्रिकन, फ्रेंच या दोन प्रमुख जाती आढळतात. आफ्रिकन झेंडूची झाडे सुमारे १०० ते १५० सेंटीमीटर उंच वाढतात. त्यांची फुले पिवळ्या, केशरी रंगाची असतात. कासा परिसरातील शेतकरी प्रामुख्याने आफ्रिकन जातीची लागवड करत आहेत. या पिकाला १५ दिवसांनी एकदा पाणी देणे आवश्यक असते तसेच महिनाभराने खतांचा पुरवठा करावा लागतो. एकदा रोपे लावल्यानंतर विशेष देखभालीची गरज भासत नाही.
-----------------------------
किलोला २५ ते ३० रुपयांचा भाव
डहाणूतील महालक्ष्मी मंदिर परिसरातील फुलविक्रेते तसेच दादर-ठाणे येथील व्यापारी या भागातून फुले खरेदी करत आहेत. त्यामुळे फुलशेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सध्या बाजारात झेंडू फुलांना प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांचा भाव मिळत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. दोन महिन्यांपासून झेंडू, शेवंती व बिजली या फुलांना मोठी मागणी आहे.
---------------------------------
झेंडू फुलशेतीमुळे शेतात जवळपास २० ते २५ जणांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे स्थलांतराची गरज कमी झाली आहे. डहाणू परिसरातील महालक्ष्मी, संतोषी माता मंदिरातील फुलविक्रेते तसेच दादरमधील व्यापारी येथे येऊन फुले घेतात. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होत आहे.
- वैभव ठाकूर-पेठ, फुल उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.