मुरबाड विकास आराखड्यावरून नागरिक आक्रमक
पुरातन मंदिरे आणि बाजारपेठ धोक्यात ः सुनावणीत अधिकारी धारेवर
मुरबाड, ता. १४ (बातमीदार) ः मुरबाड नगर पंचायतीच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. या आराखड्याबाबत दाखल केलेल्या हरकतींच्या सुनावणीदरम्यान शुक्रवारी (ता. १३) नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रस्ता रुंदीकरणात शहरातील १०० वर्षांपूर्वीची पुरातन मंदिरे आणि मुख्य बाजारपेठ बाधित होणार असल्याने हा सदोष आराखडा त्वरित रद्द करावा, अशी सामूहिक मागणी करीत नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले.
मुरबाड नगर पंचायतीच्या विकास आराखड्यावर शहरातील सुमारे ३०० नागरिकांनी सूचना व हरकती दाखल केल्या आहेत. यावर मुरबाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये गुरुवारी (ता. १२) सुनावणी घेतली. या वेळी अधिकारी म्हणून राजेंद्र चव्हाण, शरद रणदिवे, अशोक खांडेकर, दिशा सावंत व मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे, नगरसेविका स्नेहा संपवणे, माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांची संयुक्त समिती नेमली होती.
नगरविकास योजनेबाबत सुनावणी सुरू असताना नागरिकांनी विकास आराखड्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांनी तर हा आराखडा बनवणाऱ्या व्यक्तीला सुनावणीवेळी हजर करा, असे सांगितले. मुरबाड नगर पंचायतीच्या विकास आराखड्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असून, या रस्त्यावरील घरे व दुकाने तोडल्यामुळे शहर भकास होणार आहे, तर नागरिक देशोधडीला लागणार आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे शहराच्या बाजूला असलेल्या शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात आरक्षण दाखविल्याने माळीनगर व साजई गावातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे आक्षेप?
१. मुरबाड शहरातील पुरातन हनुमान मंदिर नगरविकास योजनेच्या नकाशात दाखवलेलेच नाही. या मंदिराच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या रस्ता रुंदीकरणामुळे मंदिराचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग तुटण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच पुरातन जैन मंदिराचासुद्धा दोन्ही बाजूंचा भाग तुटणार असल्याचे नकाशामध्ये दिसत आहे.
२. मुरबाड शहर विकास आराखड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र किंवा एकत्र येण्यासाठी जागा राखीव ठेवलेली नाही. बालकांच्या शिक्षणासाठी अंगणवाडीसाठी जागा राखीव ठेवलेली नाही. त्यामुळे हा विकास आराखडा सदोष असल्याचे मत व्यक्त करीत तो रद्द करावा, अशी मागणी नागरिक करीत होते.
मुरबाड नगरपंचायत विकास आराखड्यात काही जमिनीत नाला नसतानाही तेथे नाला असल्याचे दाखवून त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव दाखवला आहे. त्यामुळे या जागेवर नाला नाही तो आणला कुठून, असा प्रश्न आहे. काही खासगी मालकीच्या जागा एनए झालेल्या आहेत. त्याचे लेआऊट मंजूर झालेले आहेत. अशा जागांवरसुद्धा रस्ते व प्लॉटचे आरक्षण दाखवले आहे.
- अनिल देसले, माजी सदस्य, पंचवायत समिती, मुरबाड
माझ्या जमिनीपैकी सुमारे ७५ टक्के जमिनीवर आरक्षण दाखवलेले आहे. त्यामुळे माझे फार मोठे नुकसान होणार आहे. काही ठरावीक शेतकऱ्यांच्या जमिनीवरच आरक्षण कसे पडले, असा आमचा प्रश्न आहे.
- नारायण देसले
नगरविकास आराखडा नागरिकांच्या सूचना व हरकती मांडण्यासाठी प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये नागरिकांनी केलेल्या सूचना व आराखड्यात राहिलेल्या त्रुटी यांची दुरुस्ती करून नंतर हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. हा आराखडा प्रारूप असून अंतिम नाही, असे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी सांगितले.
फोटो ओळी
मुरबाड ः विकास आराखड्यावरील हरकतींच्या सुनावणीदरम्यान नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.