‘गरिबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरात
वाढत्या उन्हामुळे मातीच्या माठांना मागणी
कासा, ता. १५ (बातमीदार) : राज्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. या वातावरणात अनेक जण उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. यात पारंपरिक मातीच्या माठांचादेखील समावेश आहे. ‘गरिबांचा फ्रीज’ म्हणून ख्याती असलेल्या मातीच्या माठांची मागणी या कडक उन्हाळ्यात वाढल्याचे सध्याचे चित्र आहे.
मातीचे माठ हे पाणी थंड ठेवण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. गरिबांप्रमाणेच मध्यमवर्गीयदेखील मातीच्या माठांना प्राधान्य देतात. लाल व काळ्या रंगाच्या माठांतील पाणी हे गारेगार असते. फ्रीजचे पाणी प्यायल्यानंतर होणाऱ्या व्याधी या माठातील खंडगार पाणी प्यायल्यानंतर होत नाहीत. माठातील पाणी हे नैसर्गिकरीत्या थंड होते. त्यामुळे गरमीच्या दिवसांत अनेक जण माठातील पाणी पित असतात. दुसरीकडे, डहाणू परिसरात पारंपरिक कुंभारकाम करणाऱ्या कुटुंबांची संख्या आता हातावर मोजण्याइतकी उरली आहे. नव्या पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याने स्थानिक पातळीवर मातीची भांडी बनवणारे कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर माठ येथे विक्रीसाठी आणले जात आहेत.
माठ तयार करण्यासाठी लागणारी चांगली माती, भुसा, कोळसा तसेच वाहतूक खर्च वाढल्याने माठांच्या किमतीतही सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या लहान माठाच्या आकारानुसार २२० ते ३०० रुपयांपर्यंत, तर मोठ्या माठांची किंमत ४०० ते ४५० रुपयांपर्यंत आहे. नळ असलेल्या माठांची किंमत त्यापेक्षा अधिक आहे. अनेक गृहिणी काळ्या रंगाच्या माठांना पसंती देत असल्याचेदेखील चित्र आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येणारे माठ विक्रेते सध्या डहाणू, चारोटी, कासा तसेच गावखेड्यांमध्ये दारोदारी फिरून मोठ्या टोपल्यांमधून माठांची विक्री करत आहेत. वेती, आशागड, गंजाड, मनोर, डहाणू व धुंदलवाडी येथील बाजारातही माठांची विक्री सुरू आहे. माठविक्रेत्यांनी सांगितले की, आम्ही पाच-सहा जण मिळून टेम्पोमध्ये माठ घेऊन आलो आहोत. चार दिवस परिसरात फिरून विक्री करत आहोत. दिवसाला आठ ते दहा माठ विकले जातात आणि सुमारे आठशे ते हजार रुपयांपर्यंत फायदा होतो. विक्री झाल्यानंतर व्यापाऱ्याला पैसे देतो.
याशिवाय माठांसोबतच मातीच्या चुलींनाही बाजारात मागणी दिसून येत आहे. काही ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असल्याने अनेक नागरिक पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळताना दिसत आहेत.
-----------------------------
कोट :
ग्रामीण भागात अजूनही मातीच्या वस्तूंना मागणी आहे. काही मध्यमवर्गीय कुटुंबे फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील नैसर्गिक थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे माठांची विक्री चांगली होत आहे.
- निनाद माही, माठविक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.