‘समान विकास’चा प्रस्ताव फेटाळला
नाराज भाजप नगरसेवकांनी आमदारांना गुढ्या परत पाठवल्या
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) ः अंबरनाथ नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १३) झाली. या सभेत शिवसेनेने भाजपच्या २८ नगरसेवकांच्या प्रभागांतील विकासकामांना मंजुरी नाकारल्याचा आरोप करत भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाठवलेल्या गुढ्या भाजपच्या सर्व नगरसेवकांनी शुभेच्छापत्रासह परत पाठवल्या.
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व ५९ प्रभागांमध्ये प्रत्येकी २५ लाख रुपयांची समान विकासकामे सुचविण्यात आली होती; मात्र शिवसेनेने आपल्या ३२ नगरसेवकांच्या संख्याबळाचा वापर करत भाजपच्या २८ नगरसेवकांच्या प्रभागातील सर्व विकासकामे रोखून धरली. तसेच ‘समान विकास धोरण’ फेटाळून लावत केवळ स्वतःच्या प्रभागांतील कामांनाच मंजुरी दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या निर्णयामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
याप्रकरणी अंबरनाथ येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी अंबरनाथ शहर विकास आघाडीचे गटनेते अभिजित करंजुळे पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समान निधी देण्याचा प्रस्ताव होता; मात्र तो जाणीवपूर्वक फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
विषय नाकारल्यामुळे निषेध
आमदार रवींद्र फाटक यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छांसह विकासाचे पत्र पाठवले होते; मात्र शहराच्या विकासाशी संबंधित विषय नाकारल्यामुळे निषेध म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी त्या गुढ्या परत पाठवल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासाला अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, विश्वजित करंजुळे पाटील, अनिता भोईर, सुजाता भोईर, लक्ष्मी जयशंकर तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.