अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : युद्धजन्य परिस्थिती आणि समृद्धी महामार्गावरील वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात काही प्रमाणात तात्पुरती अडचण निर्माण झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नसून, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण अंबरनाथचे शिधावाटप अधिकारी श्रीकांत पाटसुळे यांनी दिले आहे.
घरगुती वापरासाठी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असूनण सिलिंडरची घरपोच वितरण सेवाही नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सिलिंडरची अनावश्यक साठा टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या संदर्भात घरगुती ग्राहकांना काही समस्या भेडसावल्यास किंवा तक्रार करायची असल्यास उपनियंत्रक शिधावाटप ‘फ’ परिमंडळ कार्यालयात २४ तासांसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही तक्रारीसाठी ठाणे ‘फ’ परिमंडळाच्या ८१६९२३०६६५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती पाटसुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.