स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य द्यावे
महासभेत अनधिकृत फेरीवाल्यांवरून सदस्य आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : दिवसेंदिवस ठाणे महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्ते, पदपथ अडवून अनधिकृतपणे आपले बस्तान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच, तक्रारीनंतर कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा फेरीवाले येऊन त्याच ठिकाणी बस्तान मांडतात. यामुळे फेरीवाल्यांवरील कारवाई केवळ दिखावा ठरत असल्याचा आरोप करीत, अतिक्रमण विभागाच्या कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. तसेच, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या, स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य द्या, अशा सूचना या वेळी सभागृहात नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केल्या.
ठाण्यात फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असताना अनधिकृत व्यवसायाला लगाम घालण्यासाठी आखलेले फेरीवाला धोरण अद्याप प्रत्यक्षात लागू झालेले नाही. अशातच बुधवारी (ता. १९) पार पडलेल्या महासभेत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. तसेच, ठाणे स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, गोखले रोड, गावदेवी मैदान परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत. या फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाकडून कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याचा मुद्दा मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला. तसेच, स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य द्या, सर्वेक्षण करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या, अशा सूचनादेखील पेंडसे यांनी केल्या.
ठाणे शहरात २०१४ मध्ये शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या मान्यतेने २०१६ व २०१९ मध्ये दोन टप्प्यात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर गेल्या सात वर्षांत फेरीवाल्यांची संख्या तिप्पट-चौपट झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण हे जुन्या अधिकृत फेरीवाल्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. सर्वात जुन्या अधिकृत फेरीवाल्यांना हॉकर्स झोन उपलब्ध करून द्यावे. त्यानंतरच नव्याने फेरीवाल्यांच्या यादीला मान्यता द्यावी, अशी मागणी नम्रता कोळी यांनी करीत, पालिकेने खासगी कंपनीऐवजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्याचा विचार करण्याची भूमिका कोळी यांनी मांडली. तसेच मीनाक्षी शिंदे यांनीदेखील अनधिकृतपणे रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी, ही भूमिका नगरसेवकांनी प्रत्येक वेळेस का घ्यावी? अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाई करावी असे का वाटत नाही? असे सवाल उपस्थित केले. तर अमित सरय्या यांनीदेखील प्रभाग क्रमांक १५ मधील मंगळवारच्या मार्केटमुळे नागरिकांना होणाऱ्या समस्येचा पाढा वाचला.
सात हजार फेरीवाले
प्रशासनाकडून उपायुक्त उमेश बिरारी यांनी, फेरीवाल्यांना धोरणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. ठाणे पालिकेने फेरीवाल्यांचा सर्व्हे केला होता. सर्व्हेनुसार शहरात केवळ सात हजार फेरीवाले असून, त्यापैकी केवळ दोन हजार ७८८ फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केल्याने त्यांची नोंदणी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. फेरीवाल्यांना समिती गठित करण्यासाठी निवडणुकांचा कार्यक्रमदेखील जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्या वेळी मतदार यादी अद्ययावत नसल्याचे सांगत काही संघटनांनी त्यावर हरकती घेत, आधी यादी अद्यावत करा, मगच निवडणूक घ्या, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
स्वतंत्र पथक नेमणार
सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार सर्वेक्षणाच्या कामात खासगी संस्थेची मदत घेण्यात येईल, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून नगर पथविक्रेता समिती गठित करण्यात येईल, फेरीवाल्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार, मुख्य बाजारपेठेसह प्रभाग क्रमांक १५ मधील मंगळवारच्या मार्केटला भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.