विलेपार्ले पादचारी पूल धोकादायक;
प्रवाशांचा संताप वाढला
मुंबई, ता. २१ (बातमीदार) : विलेपार्ले पूर्व येथील रेल्वे पादचारी पूल अत्यंत दुरवस्थेत असून, प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पार्ले पूर्वेकडे उतरणाऱ्या हजारो प्रवाशांचा दररोज या पुलावरून मोठ्या प्रमाणात वावर असतो. मात्र, पुलावरील टाईल्स अनेक ठिकाणी निखळल्या असून, त्यामुळे गंभीर अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ६ ते ८ या गर्दीच्या वेळेत पुलावर मोठी वर्दळ असते. या वेळी तुटलेल्या किंवा उखडलेल्या टाईल्समध्ये चपला अडकून प्रवाशांचा तोल जात असून, अनेक जण पडत आहेत. काही महिला व पुरुष प्रवासी जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
प्रवाशांच्या मते, दुरुस्तीअभावी पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निखळलेल्या टाईल्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.