वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २४ ः कळंबोलीतील स्टील मार्केट सध्या गंभीर अडचणींचा सामना करत आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळित झाला असून त्याचा थेट परिणाम लोखंड पोलाद बाजारातील कटिंग आणि फॅब्रिकेशन व्यवसायावर झाला आहे. ऑक्सिजन सिलिंडरसोबत वापरला जाणारा व्यावसायिक एलपीजी गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यापाऱ्यांना कामकाज कमी करावे लागत आहे, तर काही ठिकाणी कटिंगचे युनिट्स पूर्णपणे बंद ठेवावी लागत आहेत. परिणामी, स्टील मार्केटमध्ये आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी, माथाडी कामगार, मालवाहतूकदार आणि मजूर यांच्यावर त्याचा व्यापक परिणाम दिसून येत आहे.
देशभरातून लोखंड, पोलाद, प्लेट, सळई, अँगल, चॅनेल्स तसेच इतर धातूजन्य साहित्य कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये दाखल होते. त्यानंतर विविध उद्योगांसाठी आवश्यकतेनुसार कटिंग, फॅब्रिकेशन आणि वर्गीकरण करून ते देशाच्या विविध भागांत पाठवले जाते. रोजच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर मालाची लोडिंग-अनलोडिंग, कटिंग, वेल्डिंग आणि वाहतूक या प्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे येथे हजारो कामगारांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या बाजारात जवळपास हजार ते बाराशे गाड्यांमधून दररोज कटिंग आणि फॅब्रिकेशनचे काम चालते. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी दररोज सुमारे बाराशे ते पंधराशे सिलिंडरची गरज भासते; परंतु गेल्या काही दिवसांपासून लोखंड पोलाद बाजारात दिवसाला किमान ४०० ते ५०० सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, की व्यावसायिक गॅसचा नियमित पुरवठा झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. कळंबोलीसारख्या मोठ्या बाजारात पुरवठा साखळी खंडित झाल्यास त्याचा परिणाम इतर औद्योगिक क्षेत्रांवरही होऊ शकतो. त्यामुळे सरकारने व्यावसायिक वापरासाठी स्वतंत्र नियोजन करून स्टील उद्योगाला तातडीने दिलासा देण्याची मागणी पुढे येत आहे.
४५ टक्के व्यवसायावर परिणाम
या तुटवड्यामुळे अनेक कटिंग युनिट्स अर्धवट क्षमतेने चालू आहेत, तर काही ठिकाणी काम थांबवावे लागले आहे. लोखंडाचे कटिंग वेळेत न झाल्याने ग्राहकांना माल उशिरा मिळत आहे. काही व्यापाऱ्यांनी नवीन ऑर्डर्स स्वीकारणे मर्यादित केले आहे. यामुळे जवळपास ४० ते ४५ टक्के व्यवसायावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगतात.
मजुरीचे दिवस घटले
गॅसटंचाईचा परिणाम स्टील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या रोजगारावरही त्याचा थेट परिणाम झाला आहे. रोजच्या रोज लोडिंग-अनलोडिंगवर अवलंबून असलेल्या कामगारांना कामाचे प्रमाण कमी मिळत आहे. मालाची आवक-जावक मंदावल्याने मजुरीचे दिवस घटले आहेत.
कामगारांची उपलब्धता घटली
कटिंग, फॅब्रिकेशन, वेल्डिंग आणि इतर सहाय्यक कामांसाठी मजूर आवश्यक असतात; मात्र व्यावसायिक गॅसटंचाईसोबतच घरगुती सिलिंडर मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्याने स्वयंपाकासाठी आवश्यक गॅस मिळत नाही. दैनंदिन जगणे कठीण झाले असून अनेक मजूर आपल्या गावी परतल्याने कामगारांची उपलब्धता घटली आहे.
वाहतूक साखळी विस्कळित
कटिंग आणि फॅब्रिकेशनमध्ये अडथळे आल्याने वाहतूक व्यवसायालाही फटका बसला आहे. तयार माल वेळेत उपलब्ध न झाल्याने स्टील वाहून नेणारी वाहने बाजारात उभी ठेवावी लागत आहेत. अनेक ट्रकचालक आणि वाहतूकदारांना अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागत असून वाहतूक साखळी विस्कळित होत आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांचे अतिरिक्त खर्च वाढले असून पुरवठा वेळापत्रक बिघडले आहे.
ग्राहकांवर भार
स्टील कटिंगमध्ये विलंब होत असल्याने बाजारातील दरातही वाढ दिसू लागली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्टीलच्या दरात प्रति किलो पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने ग्राहकांनाही अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
कामे हाती असूनही गॅसअभावी पूर्ण करू शकत नाही. परिस्थिती सुधारल्याशिवाय उद्योग सुरू होणे कठीण आहे.
- महेश निकम, फॅब्रिकेशन उद्योजक
कळंबोली स्टील मार्केटमधील गॅसटंचाईमुळे कटिंग व फॅब्रिकेशन कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली असून याचा थेट फटका वाहतूक व्यवसायाला बसत आहे. यासंदर्भात शासन स्तरावर समन्वय साधून पुरेसा साठा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील.
- रामदास शेवाळे, कामगार नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.