पथविक्रेता समिती निवडणूक स्थगित करा : महेश कदम
विरार, ता. २४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या २०२५-२६ साठी प्रस्तावित पथविक्रेता समिती निवडणुकीबाबत वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, ही निवडणूक तत्काळ स्थगित किंवा रद्द करण्याची ठोस मागणी विशेष कार्यकारी अधिकारी महेश कदम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपायुक्त अजित मुठे यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
येत्या रविवारी (ता. २९) होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण आठ सदस्य पदे जाहीर करण्यात आली होती. मात्र अंतिम मुदतीपर्यंत केवळ पाच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. यात अनुसूचित जमाती (एसटी), अल्पसंख्याक आणि दिव्यांग महिला या आरक्षित प्रवर्गांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे तीन महत्त्वाच्या जागा पूर्णतः रिक्त राहिल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अपूर्ण व संशयास्पद ठरत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले, की महाराष्ट्र पथविक्रेता नियम, २०१६ मधील नियम १४ (२) तसेच पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ नुसार समितीत सर्व प्रवर्गांचे प्रतिनिधित्व बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत आरक्षित जागा रिक्त ठेवून निवडणूक घेणे म्हणजे कायद्याच्या उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे असून, अशा समितीची वैधता न्यायालयात आव्हानास पात्र ठरू शकते. याशिवाय अपेक्षित संख्येपेक्षा कमी उमेदवार असल्याने निवडणूक स्पर्धात्मक राहत नाही, ज्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनाही धक्का बसत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मागील बुधवारी (ता. १७) सादर केलेल्या निवेदनाद्वारे फेर सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. फेर सर्वेक्षण न करता निवडणूक घेणेदेखील गंभीर कायदेशीर त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे महेश कदम यांनी सद्य:स्थितीत निवडणूक तत्काळ स्थगित किंवा रद्द करण्यात यावी. तसेच नव्याने अर्ज प्रक्रिया राबवून सर्व प्रवर्गांना समान संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
विशेषतः आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना प्रोत्साहन देण्यात यावे, फेर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच पुढील निवडणूक घेण्यात यावी. कायद्यानुसार पूर्ण व वैध प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात यावे, अशा मागण्या करीत या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले तर मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा इशारादेखील कदम यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.