पाणीपट्टीत वाढीविरोधात निवेदन
अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : पाणीपट्टीत वाढ होणार का, पाण्याच्या बिलात किती वाढ होणार, अशा सर्व प्रश्नांची प्रशासनाने नीट उत्तर द्यावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली. दरम्यान, पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी (ता. २४) दिले. दरम्यान, आठ टक्के दरवाढ केलेली नाही. आढावा घेत निवेदन केले पाहिजे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
रितू तावडे यांनी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाणीपट्टी वाढीला स्थगिती दिल्याचे जाहीर केले होते. मात्र पाणीपट्टीत आठ टक्क्यांपर्यंत वाढ करणार, असा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. ही आठ टक्क्यांपर्यंतची वाढ मुंबईकरांना परवडणारी नाही. याऐवजी राज्य सरकारकडे १० हजार कोटींची थकबाकी आहे. ती थकबाकी कशा प्रकारे वसूल करता येईल, यावर पालिका प्रशासनाने भर द्यावा. आठ टक्क्यांनी वाढ केली तर बिलात किती वाढ होईल, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला. मुंबईला चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यापैकी एक हजार दशलक्ष लिटर पाणी हे गळतीमुळे वाया जाते, असेही त्या म्हणाल्या. दुसरीकडे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. तर ८० टक्के आलिशान इमारतींना टँकरने पाणीपुरवठा होतो. शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणे हा मुंबईकरांचा अधिकार आहे. ‘एफडी’ मोडीत काढून प्रकल्प राबवीत आहात. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ का, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी या वेळी केला.
निवेदन राजकीय हेतूने प्रेरित
विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांचे निवेदन राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी टीका सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली. पेडणेकर यांचे निवेदन दिशाभूल करणारे असून, २०२१-२२ मध्ये ५.२९ टक्क्यांनी वाढ केली होती. मात्र गेल्या तीन वर्षांत पाणीपट्टीत वाढ केलेली नाही. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पाणीपट्टीत वाढ होणार नाही, तसा उल्लेख महायुतीच्या वचननाम्यात आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.