वीस वर्षीय तरुणाचा
बुडून मृत्यू
पेण, ता. २७ (वार्ताहर) : पेण शहरात भोगावती नदीपात्रातील पिंपळडोह येथे मित्रांसोबत खेळत असताना पाण्यातला बॉल काढण्यासाठी उडी घेतलेल्या तरुणाचा नदीपात्रात गुरुवारी (ता. २६) बुडून मृत्यू झाला. वसीम शेख अन्सारी (२०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने पेण अग्निशामक दलाच्या माध्यमातून भोगावती नदीपात्रात शोधकार्य सुरू ठेवले होते. पोलिस शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. २७) त्याचा मृतदेह सापडला. सध्या उन्हाचे दिवस असल्याने अनेक तरुण-तरुणी, नागरिक आपल्या घरातील व्यक्तींना न सांगता आंघोळीसाठी किंवा खेळण्यासाठी नदीपात्रात, तलावाजवळ जात असतात; मात्र अनेकदा पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना घडतात, त्यामुळे पालकांनी जागरूक राहावे, असे आवाहन पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे.