‘बेस्ट’ची उपाहारगृह सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना करा : राव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालय तसेच मुंबईतील बेस्टच्या आगारांमधील काही उपाहारगृहे बंद झाली आहे. तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे. याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी ‘दि बीईएसटी वर्कर्स युनियन’ने बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
बेस्टचे चालक, वाहक आणि कार्यशाळा कर्मचारी तसेच हजारो कर्मचारी अहोरात्र मुंबईची सेवा बजावत असतात. या कर्मचाऱ्यांना सकस आणि वेळेवर आहार मिळण्यासाठी ही उपाहारगृहे हा मुख्य आधार आहेत. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक उपाहारगृहे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जर ही उपाहारगृहे बंद झाली, तर कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि पर्यायाने उपक्रमाच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो, शशांक राव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या उपाहारगृहांमध्ये इलेक्ट्रिक इंडक्शनसारख्या पर्यायांचा वापर करावा, जिल्हाधिकारी किंवा संबंधित पेट्रोलियम कंपन्यांशी संपर्क साधून उपाहारगृहांसाठी गॅसचा कोटा आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावा, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उपाहारगृह कंत्राटदारांना काही तांत्रिक निकषांमध्ये सवलत देऊन कर्मचाऱ्यांंसाठी अल्पोपाहार सुरू राहील, याची खात्री करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शशांक राव यांनी महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
---------