महालक्ष्मी यात्रेची उत्सुकता शिगेला
तयारी अंतिम टप्प्यात, दुकानदारांकडून जागा आरक्षित
कासा, ता. २८ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गुढीपाडव्यानंतर अनेक दुकानदारांनी आपापल्या जागा आरक्षित करण्यास सुरुवात केली असून यात्रास्थळी सर्कस, झुले, विविध मनोरंजनाचे खेळ उभारणीची तयारी जोरात सुरू आहे.
महालक्ष्मी यात्रेत दरवर्षीप्रमाणे यंदाही १,५०० ते २,००० लहान-मोठी दुकाने उभारली जाणार आहेत. त्यात झुले, सर्कस, जादूचे प्रयोग, भजन केंद्र, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच कांदा, लसूण, हळद, मिरची, मसाले, कडधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने असणार आहेत. याशिवाय सुकी मासळी, खेळणी, थंडपेय, मिठाई, कपडे आणि विविध वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी प्रवेश निर्गमनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे.
-------------------------------------
प्रशासनाच्या सूचना
महालक्ष्मी मंदिर परिसरात फेरीवाले, भिकाऱ्यांना मज्जाव
प्रवाशांसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गाखालील भुयारी मार्ग
कायदा व सुव्यवस्थेसाठी चार ठिकाणी पोलिस चौक्या
एक मुख्य नियंत्रण कक्ष, ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था
-------------------------
भाविकांना मंदिरात प्रवेशासाठी रस्ता मोकळा असावा, यासाठीचे नियोजन केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
- अमर पाटील, पोलिस अधिकारी